ढाका , 20 मे (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. बांगलादेशचे हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या पक्षावर अधिकृतपणे बंदी घातल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच, या निर्णयामुळे त्यांना निवडणूक लढवण्यापासूनही दूर ठेवण्यात येत आहे. त्यातच आता शेख हसीना यांच्यावर देशात दोन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी जेव्हा बांगलादेशात विद्यार्थी चळवळ सुरू झाली आणि हिंसक झाली. यादरम्यान २० जुलैला नारायणगंजच्या शिमराईल भागात विद्यार्थ्यांच्या निषेधादरम्यान सजल मियां (२०) या बूट कारखान्यातील कामगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती आणि आता त्याच व्यक्तीच्या आईने शेख हसीना आणि अवामी लीगच्या इतर नेत्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. या संदर्भात, शेख हसीना यांच्यासह ६१ अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा नारायणगंजच्या सिद्धिरगंज पोलिस ठाण्यात पीडित सेजलची आई रुना बेगम यांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचे प्रभारी अधिकारी शाहिनूर आलम यांनी सांगितले.
तक्रारदाराने असा दावा केला आहे की, हा हल्ला अवामी लीगच्या निर्देशानुसार करण्यात आला होता आणि शेख हसीना आणि इतर वरिष्ठ नेते यात सामील असल्याचा दावाही केला आहे.आरोपींमध्ये माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल, एएलचे सरचिटणीस ओबेदुल कादर, नारायणगंज शहर महानगरपालिकेच्या माजी महापौर सेलिना हयात आयवी, माजी आमदार शमीम उस्मान आणि नजरुल इस्लाम बाबू, शमीमचा मुलगा इम्तिनन उस्मान अयोन आणि पुतण्या अजमेरी उस्मान यांचा समावेश आहे.
या प्रकरणासोबतच शेख हसीना यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुयापूरचे कमरुल हसन यांनी टांगाईल न्यायिक दंडाधिकारी रुमेलिया सिराजम यांच्या न्यायालयात हसीना आणि इतर १९३ जणांवर २०२४ मध्ये 'डमी निवडणुका' आयोजित केल्याचा आणि मतदानात घोळ केल्याचा आरोप करत खटला दाखल केला. १९३ आरोपींमध्ये माजी मंत्री मुहम्मद अब्दुल रज्जाक, माजी आमदार सोटो मोनीर, माजी सीईसी काझी हबीबुल अवल, माजी आयजीपी चौधरी अब्दुल्ला अल-मामून आणि टांगेलचे माजी उपायुक्त मोहम्मद शाहिदुल इस्लाम यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode