कोणत्याही जिल्ह्याची प्रगती ही तिथे सामान्य माणसाला मिळणाऱ्या सेवा सुविधांनी ठरते. या दृष्टीने सामान्य माणसाला शासकीय सेवा देण्यासाठी अनेक प्रशासकीय इमारती जिल्ह्याच्या वैभवात भर घालत दिमाखात उभ्या आहेत. त्यातील पोलीस मुख्यालय, सांगली, पोलीस ठाणे इमारत कडेगाव आणि आटपाडीच्या इमारतींचे उद्घाटन होत आहे. यानिमित्त या इमारतींच्या स्वरूपाची माहिती…
पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत
या इमारतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय, विविध शाखांचे स्वतंत्र विभाग, सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, तांत्रिक सुविधांनी सज्ज विभाग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आदिंचा समावेश आहे. ही इमारत पूर्णतः सीसीटीव्ही प्रणाली अंतर्गत सुरक्षित असून शाश्वत ऊर्जा वापराच्या दृष्टीने सौरऊर्जा सुविधांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा, प्रशस्त पार्किंग व स्वच्छतागृहे, ऊर्जा कार्यक्षम रचना व हरित इमारत, रेन वॉटर हार्वेस्टींग या संकल्पना राबविण्यात आल्या आहेत.
या इमारतीत चार मजले असून 5244 चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्रफळ आहे. बांधकामासाठी 14 कोटी 34 लाख रुपये खर्च झाला आहे.
कडेगाव पोलीस ठाणे इमारत
या इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 9329 चौ. फूट इतके असून यासाठी 4 कोटी 12 लाख 58 हजार रुपये खर्च आला आहे. ही दोन मजली इमारत असून, या इमारतीत 18 कक्ष आहेत. इमारतीत पूर्णतः सीसीटीव्ही प्रणाली, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा, प्रशस्त पार्किंग व स्वच्छतागृहे आदि सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. ऊर्जा कार्यक्षम रचना व हरित इमारत, रेन वॉटर हार्वेस्टींग या संकल्पना राबविण्यात आल्या आहेत.
आटपाडी पोलीस ठाणे इमारत
या इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ 12873 चौ. फूट इतके असून बांधकामासाठी 4 कोटी, 66 लाख खर्च आला आहे. ही दुमजली इमारत असून, यामध्ये दहाहून अधिक कक्ष आहेत. दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा, सौरऊर्जा सुविधा, आग प्रतिबंधात्मक उपाययोजना, पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष आहेत.
पोलीस निवासस्थान
सांगली येथील पोलीस अधीक्षक मुख्यालयामध्ये प्रकार २ ची २२४ सदनिकांच्या इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजनही आज होत आहे. यामध्ये 224 सदनिकांचा समावेश असून, 181769 चौ. फूट इतके बांधकाम क्षेत्रफळ आहे. यासाठी 72 कोटी 60 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सात मजली चार इमारती आहेत. प्रत्येक सदनिकेच्या एकूण बांधकामाचे क्षेत्र ७५.६१ चौरस मीटर (८१३.८५ चौरस फूट) असून यात लिव्हिंग रूम, त्याला लागून बाल्कनी, २ बेडरूम्स, एकास संलग्न बाथरूम व एक कॉमन बाथरूम व सुबक असे स्वयंपाकघर देण्यात आले आहे.
नियोजन करताना या घरांना भरपूर हवा व उजेड मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक इमारतीला २ जिने व २ लिफ्ट्स देण्यात आल्या आहेत. सर्व इमारती मध्यवर्ती बागेच्या भोवती नियोजल्या आहेत. या बागेत लॉन, झाडे व कुंपण भिंतीला लागून गर्द झाडे लावल्यामुळे सर्व सदनिकांतून हिरवळीचा व्ह्यू आहे. या प्रकल्पात ट्रान्सफॉर्मर डिझेल जनरेटर, एस. टी. पी., सौर पॅनेल्स, अग्निशमन यंत्रणा इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. या नव्या निवासी इमारतीमध्ये आधुनिक बांधकाम, सुरक्षितता आणि सुसज्ज निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस दल्याच्या या चारही नव्या इमारतींमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात अधिक कार्यक्षमता येऊन पोलीस दलाला बळकटी येईल.
संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने