मुंबई, 8 मे (हिं.स.)।
पैसे कमी असतात, पण माणसांची श्रीमंती अपार असते. मनात थकवा असतो, पण चेहऱ्यावर हसू झळकतं. स्वप्नं थोडी मागे असतात…पण घरासाठी चालणं, थांबणं, लढणं — हेच आयुष्य वाटतं.
‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधव साकारतोय ‘मारुती’ ..एक प्रेमळ कुटुंबातला साधा, शांत, आणि खंबीर माणूस.
स्वतः पेक्षा जास्त बायको, मुलगी आणि वडिलांच्या चेहऱ्यावर हसू राहावं म्हणून सतत प्रयत्न करणारा तुमच्या आमच्यातलाच एक !
मारुतीकडे एक दिवस एक अनपेक्षित संधी येते आणि मुलीच भविष्य आणि शिक्षणाबरोबरच स्वतःच आयुष्य सुधारवण्याची आणि अभिमानाने जगण्याची संधी.
ती स्वीकारायची की दुर्लक्ष करायचं, हा निर्णय ‘मारुती’चा …असा बाप जो मुलांच्या आनंदासाठी वाटेल ते करू शकतो.
सिद्धार्थ जाधव म्हणतो, “ एक कलाकार म्हणून समृद्ध करणारी, माणुसकी शिकवणारी ही भूमिका आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील खऱ्याखुऱ्या सुपरहिरोंची ही गोष्ट आहे आणि त्यापैकी एकाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कलाकार म्हणून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत परंतु 'मारुती कदम' हे पात्र नेहमीच माझ्या जवळचे राहील. मारुती कोणी वेगळा नाही, तो आपल्यातलाच एक आहे. अशा सुपरहिरोचे आयुष्य यानिमित्ताने जवळून अनुभवता आले, यासाठी शिवराज वायचळ यांचे मनापासून आभार.''
चित्रपटात त्याच्यासोबत आहेत भरत जाधव, ओम भुतकर, पर्णा पेठे, प्राजक्ता हनमघर, श्रीकांत यादव, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर.प्रत्येकाचं अस्तित्व या गोष्टीला अधिक भावनिक आणि आपलंस बनावत .
या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे शिवराज वायचळ यांनी आणि निर्मिती आहे झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांची !
हिंदुस्थान समाचार / मेघा माने