अकोला, 13 जून (हिं.स.)।गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे विमान एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मात्र अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही विद्यार्थिनी प्रसंगावधान राखत या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. मृत्यू तिने जवळून पहिला. पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ हे ऐश्वर्याने तिच्यावर बितलेल्या दुर्दैवी प्रसंगातून प्रत्यक्ष अनुभवले.
हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या ऐश्वर्याने जोरदार आवाज ऐकल्यानंतर खिडकीतून बाहेर पाहिले असता, तिला संपूर्ण धूर दिसून आला आणि काही वेळातच आगीचे लोळ रूम मध्ये येऊ लागले. ऐश्वर्याने न घाबरता प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव करण्यासाठी चादरीने स्वतःला गुंडाळून घेतले. लगेच रूम बाहेर निघून पाचव्या मजल्या पासून झरझर पायऱ्यावरून खाली उतरायला सुरुवात केली, आणि खाली आली.
ऐश्वर्याने बिल्डिंगच्या खाली असलेल्या 6 फूट उंच भिंती ओलांडून बाहेर पडण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. मात्र तीन प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु मुळातच जिद्दी ऐश्वर्याने हार मानली नाही. परत प्रयत्न केला आणि ती चौथ्यांदा यशस्वी झाली. बिल्डिंगच्या बाहेर येताच तीने एक ऑटोरिक्षा थांबवून स्वतः रुग्णालयात गेली. या दुर्घटनेत ऐश्वर्या किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण थरारक ऐश्वर्याचे वडिल अमोल तोष्णीवाल यांनी कथन केला.।ऐश्वर्या ही कालच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अहमदाबादला परतली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे