मुंबई, २० जून (हिं.स.) : मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात. त्यामुळे महाराष्ट्राचे कौतुक करावे लागेल. दुसरीकडे काँग्रेसने एवढी वर्ष सत्ता भोगली. पण महाराष्ट्र आणि मुंबईसाठी काय केले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. हे त्यांनी सर्वांना दाखवून दिलं आहे. पण, मुंबईवर अनेक वर्ष सत्ता असणाऱ्यांनी मुंबईसाठी काय केले?, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला लक्ष्य केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या नुतनीकृत मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभात अमित शाह बोलत होते.
शाह पुढे म्हणाले की, महायुती सरकारने अटल सेतू , वरळी सी लिंक, कोस्टर रोड असे अनेक मोठे प्रोजेक्ट यशस्वी केले आहेत. परंतु, तुमचा एवढा काळ सरकारमध्ये होत. तुम्ही मुंबईसाठी काय केले?महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आले होते. परंतु त्याला आधीच्या सरकारला चालना देता आली असती. ती संधी काँग्रेसकडे होती. परंतु एवढ्या वर्षाची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईसाठी काही केले नाही.
आज आमचे महायुतीचे डबल इंजिनचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलं काम करतात. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं नेण्याचे काम करत आहेत. परंतु हे करत असताना त्यांच्यावरती टीका-टिप्पणी केली जात आहे. मुंबईतील झोपडपट्टी, धारावी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. मोठ्या प्रकल्पावरून विरोधक टीका करतात. पण, आम्ही केलेली कामे आणि प्रकल्प तुम्हालाही करता आले असते. तुम्ही न केल्यामुळे ते आमच्यावर करण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही शाह यांनी केली.
मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्याला पोषक वातावरण आहे. देशातील सर्वात उद्योगधंदे हे महाराष्ट्रात आहेत. कारण, इथे उद्योगधंद्यासाठी अनुकूल आणि पोषक वातावरण आहे. मुंबईच्या बाबतीत सांगायचं झालं, तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत सर्व आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मुंबईत आरबीआयचे मुख्यालय, शेअर मार्केट आणि सेबीचे मुख्यालय आहे. मोठमोठे आणि महत्त्वाची कार्यालये ही मुंबईत आहेत. आज महाराष्ट्र चेंबर कॉमर्स या मुख्यालयाचे उद्घाटन होतंय. यांच्याकडून भविष्यात पुढील शंभर वर्ष चांगले कार्य घडावं, यासाठी शाहांनी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी