नागपूर दंगलीच्या 80 आरोपींना सशर्त जामीन
मास्टर माईंडच्या जामीनावर 4 जुलैला निर्णय नागपूर, 30 जून (हिं.स.) : नागपुरात 19 मार्च 2025 रोजी झालेल्या दंगल प्रकरणातील 80 आरोपींना आज, सोमवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणातील 9 जणांना यापूर्वीच हायकोर्टातून जामीन मिळाला होता. तर
नागपूर दंगलीचे संग्रहित छायाचित्र


मास्टर माईंडच्या जामीनावर 4 जुलैला निर्णय

नागपूर, 30 जून (हिं.स.) : नागपुरात 19 मार्च 2025 रोजी झालेल्या दंगल प्रकरणातील 80 आरोपींना आज, सोमवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणातील 9 जणांना यापूर्वीच हायकोर्टातून जामीन मिळाला होता. तर दंगलीचा सूत्रधार (मास्टर माईंड) फईम शमीम खान याच्या जामीन अर्जावर 4 जुलै रोजी निर्णय होणार आहे.

नागपूरच्या महाल परिसरात 19 मार्च 2025 रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन झाले होते. त्यावेळी प्रतिकात्मक कबरीला गुंडाळून जाळलेल्या हिरव्या चादरीवरून अफवा पसरवण्यात आली. त्यानंतर शहराच्या महाल परिसरातील शिवाजी चौक, चिटणीस पार्क परिसरात हिंसाचार झाला. यावेळी पोलिसांवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी यशोधरा नगरातील संजय बाग कॉलोनीतील रहिवासी फहीम शमीम खान याला दंगलीचा सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली. त्यासोबतच शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 100 हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. यापैकी 9 जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यापूर्वीच जामीनावर सोडले आहे. हायकोर्टाच्या या आदेशाचा आधार घेत जिल्हा व सत्र न्यायालयाने 80 जणांना सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान दंगलीचा सूत्रधार फईम शमीम खान याच्या जामीन अर्जावर 4 जुलै रोजी निर्णय होणार आहे.

या सर्व 80 आरोपींची प्रत्येकी 1 लाख रुपये जातमुचलक्यावर सशर्त सुटका करण्यात आली आहे. अटीनुसार, आरोपींनी आठवड्याला दोनदा पोलिस ठाण्यात हजेरी लावणे अपेक्षित असून त्यांनी तपासात तसेच खटल्यात सहकार्य करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात न्यायाधीश ए. आर. कुलकर्णी यांनी निर्णय दिला. यावेळी आरोपींतर्फे ॲड. आसिफ कुरेशी, ऍड. रफीक अकबानी, ऍड. अश्विन इंगोले, ऍड. शाहबाज सिद्दीकी आदींनी बाजू मांडली. तर, शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी युक्तीवाद केला.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande