भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाणांचा अर्ज दाखल
पक्षच आपली ओळख आणि अभिमान असल्याचे सांगितले मुंबई, 30 जून (हिं.स.) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वर्तमान कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज, सोमवारी प्रदेशाध्य पदासाठी नामांकन अर्ज सादर केला. याप्रसंगी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, निवर्तमान प्रदेशाध्यक
किरेन रिजिजू यांच्याकडे नामांकन अर्ज सादर करताना, रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर मान्यवर


पक्षच आपली ओळख आणि अभिमान असल्याचे सांगितले

मुंबई, 30 जून (हिं.स.) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वर्तमान कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज, सोमवारी प्रदेशाध्य पदासाठी नामांकन अर्ज सादर केला. याप्रसंगी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, निवर्तमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

रविंद्र चव्हाण सध्या महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्ष आहेत. चव्हाण यांच्या नावाची घोषणा 1 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. निवर्तमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने ही जबाबदारी आता चव्हाणांकडे सोपवली जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने शुक्रवारी देशातील 3 राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक नेमले त्यानुसार केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची महाराष्ट्रचे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रिजिजू यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर संवाद साधताना चव्हाण म्हणाले की, राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले. त्यामुळे भाजपा हीच माझी ओळख आहे, याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे समर्पित कार्यकर्ते अशी त्यांनी ओळख आहे. चव्हाण यांची 2002 साली भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली. त्यानंतर 2005 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून नगरसेवक म्हणून विजयी झालेत. तसेच 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झाले. त्यानंतर 2009 मध्ये नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून दणदणीत विजय मिळवला. तेव्हापासून 2024 पर्यंत सातत्याने 4 वेळा ते या भागाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्याचप्रमाणे 2016 मध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चव्हाणांनी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तसेच एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलेय. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 2 खात्यांचा कारभार, तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande