मुंबई, 5 जून, (हिं.स.)। देवमाणूस- मधला अध्याय मालिका प्रसारित झाली आणि उद्याच्या भागात नवीन काय याची लोकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे . प्रत्येक पात्र आपल्या कामांनी प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. पण जेष्ठ अभिनेता माधव अभ्यंकर म्हणजेच हिम्मतराव देशमुख यांना पाहण्यासाठी लोकांची वेगळीच उत्सुकता आहे. माधव अभ्यंकरांनी या मालिकेबद्दल आणि आपल्या भूमिकेबद्दल चर्चा केली. “या मालिकेमध्ये मी हिम्मतराव देशमुखची भूमिका साकारत आहे आणि त्याला सर्व अप्पा म्हणून ओळखतात. तो गोपाळचा बाप आहे. हिम्मतराव पेशाने पैलवान आणि शेतकरी आहे आणि जरी आता तो कुस्ती खेळत नसला तरी एका काळात त्यांनी अनेकांना मातीत लोळवले आहे. हे अतिशय इरसाल पात्र आहे. अप्पाच्या दोन बायका आहेत रंजना आणि फुलादेवी. त्याला बायकांबद्दल थोडं जास्त आकर्षण आहे, त्यासाठी त्याने आपली संपत्ती आणि पैसे खर्ची घातले आहे.
पण तो दाखवतो असे कि कलाकारांना मान दिला पाहिजे. त्याला पहिल्या बायको पासून एक मुलगा झाला पण तो पळून गेला. आता दुसरी बायको केली त्याच्यापासून त्याला एक मुलगा आहे जो पोलीस आहे आणि एक लहान मुलगी आहे. प्रेक्षक अजून अण्णा नाईकला विसरले नाहीत कारण जेव्हा माझा प्रोमो आला तेव्हा हीच चर्चा सुरु होती कि अण्णा इज बॅक. आता 'रात्रीस खेळ चाले' याचा ही ४ था भाग आणा. मी जेव्हा अण्णाची भूमिका साकारत होतो तेव्हा मला मालवणी भाषा शिकावी लागली होती ज्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. कोणतीही भूमिका करताना मेहनत ही करावीच लागते मग ती बॉडीलँग्वेज, लुक किंवा भाषा असो. या सर्वात भाषा हा अतिशय महत्वाचा भाग असतो. 'रात्रीस खेळ चाले' मध्ये मला बिलकुल मालवणी येत नव्हतं पण मी त्यावर काम केलं. - 'येवा कोकण आपलाच असा' नाटक शोधलं जिथून मला ती भाषा उत्तमपणे शिकायला मिळाली. हिम्मतराव या भूमिकेसाठी मला सातारची भाषा बोलायची आहे, पण या भाषेचा लहेजा आहे. माझे अनेक प्रोजेक्ट्स मी साताराला शूट केले आहेत. इथे माझे अनेक मित्र ही आहेत ज्यामुळे मला ही भाषा थोडी माहिती आहे. माझी एक पद्धत आहे कि माणसातमिसळतो आणि मला भाषा कळते. मी सेटवर गावातल्या माणसांबरोबर गप्पा मारतो त्यांची बोलायची पद्धत त्यांचा संवाद कसा आहे त्याचा अभ्यास करतो आणि ते आत्मसाद करतो. ही मालिका मला कशी मिळाली याचा किस्सा सांगायचं झाला तर मला मालिकेची निर्माती श्वेता शिंदे त्यांचा मेसेज आला कि सर, तुम्ही सध्या काय करत आहात. तर मी त्यांना सांगितले कि हल्लीच मी माझं प्रोजेक्टच काम संपवले आहे. तेव्हा श्वेता मला म्हणाली सर, तुम्हाला मी विचारात नाही सांगत आहे कि तुम्ही कोणालाच डेट देऊ नका. मी तुमच्यासाठी देवमाणूस मध्ये एक भूमिका क्राफ्ट केली आहे. त्यानंतर ऑडिशन आणि लुक टेस्ट झाली. मी अनेक वेगवेगळ्या मालिका केल्या आहेत. पण झी मराठी बरोबर माझं एक वेगळंच नातं आहे असं मला नेहमी वाटतं 'रात्रीस खेळ चाले' च्या आधी मी झी मराठीची 'कळत नकळत' नावाची मालिका केली होती. आता या नवीन भूमिकेमध्ये मला लोक स्वीकारतीलच याची १०० टक्के खात्री आहे. मला स्वतःला ही उत्सुकता आहे कि मालिकेमध्ये पुढे काय होणार. मला ही आव्हानात्मक काम करायचे आहे म्हणजे भूमिकेवर काम करताना घामटा सुटला पाहिजे.”
तेव्हा बघायला बिसरू नका 'देवमाणूस- मधला अध्याय' दररोज रात्री १०:०० वाजता झी मराठीवर. आणि आम्हाला सांगा कि ही मालिका तुम्हाला कशी वाटत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर