अमरावती, 5 जून (हिं.स.)
अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पित्याने सलग वर्षभर आपले लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार एका 24 वर्षीय तरुणीने अमरावतीच्या राजापेठ पोलिसात केली आहे. याप्रकरणी नात्याला काळीमा फासणाऱ्या त्या पोलीस पित्या विरोधात बलात्कार, विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेवेळी आरोपी पिता हा अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्या तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीने 4 जून रोजी सकाळी सात वाजता पीडित मुलीला बॅड टच केला, तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणारा त्रास असाहाय झाल्याने पीडित तरुणीने राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सन 2015 मध्ये आठवीत असतानाही आरोपीने आपल्याशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आईला बाहेरगावी पाठवून आरोपीने आपल्यावर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार त्या तरुणी केली आहे. ही माहिती आईला सांगितल्यावरही जर माहिती बाहेर गेली तर सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी सुद्धा आरोपीने त्या तरुणीला व तिच्या आईला दिली होती.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी