
अमरावती, 9 जून (हिं.स.)
चांदूर रेल्वे शहरात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिस दप्तरी असलेल्या नोंदीनुसार गेल्या चार दिवसांत येथे सतत चोऱ्या झाल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी पुढे आली आहे. या गोष्टींकडे खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरजही त्यामुळेच निर्माण झाली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, ४ जून रोजी रोजी पात्रीकर कॉलनी, ५ जून रोजी आठवडी बाजार व ६ जून रोजी शिक्षक कॉलनी येथे चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावरील अंबापुर येथील हनुमान मंदिरात दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना ७ जून रोजी उघडकीस आली. अशा सततच्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर चोऱ्यांचे सत्र कधी थांबणार ? असा सवाल शहरवासी पोलिस विभागाला करीत आहे. त्यामुळे आता ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहे.
मागील दोन ते तीन महिन्यात चांदूर रेल्वे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे त्रस्त होऊन शेकडो नागरिक काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिस स्टेशनवरसुद्धा धडकले होते. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत पती-पत्नी आरोपीला जेरबंद केले. त्यांनी शहरातील तीन चोरीच्या घटनांची कबुली दिली होती. पोलिसांनी सदर पती-पत्नी आरोपींना संपूर्ण चांदूर रेल्वे शहरातून पायदळ फिरवून नागरिकांना चोरट्यांची ओळख व्हावी, याकरिता एक प्रकारे रॅलीच काढली होती. यानंतर चोऱ्यांना आळा बसेल असे नागरिकांना वाटत होते. परंतु आता पुन्हा चोरट्यांनी चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात हैदोस घालायला सुरुवात केली आहे.
चांदूर रेल्वे शहरातील पात्रीकर कॉलनी परिसरातील प्रवीण इंगळे यांच्याघरी १ ते ४ जूनच्या दरम्यान चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून कपाटातील एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर आठवडी बाजार परिसरातून ५ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका ४१ वर्षीय महिलेच्या पिशवीतील नगदी ४० हजार रुपये व एक साधा मोबाईल असा एकूण ४० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. शिक्षक कॉलनी परिसरात राहणारे कमलाकर भाऊराव आखरे यांच्या घरी ६ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसताना कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील २४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी