भोपाळ , 3 जुलै (हिं.स.)। येथील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी(दि.३) सकाळी ७:३० च्या सुमारास दरबारजवळ भाविक उभे असताना घडली. हे सर्व भक्त बाबा बागेश्वर यांना भेटण्यासाठी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश यांचे सासरे श्यामलाल कौशल (५०) यांचा यामध्ये मृत्यू झाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाबा बागेश्वर यांचे काही भक्त हे टिन शेडखाली उभे होते. याच दरम्यान शेड कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक खाली पडले.या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. श्यामलाल कौशल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच ४ जुलै रोजी धीरेंद्र शास्त्री यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांचं कुटुंब उत्तर प्रदेशहून बागेश्वर धामला आलं होतं. गुरुवारी सकाळी सर्वजण तयारी करून शास्त्रींना भेटण्यासाठी पोहोचले. याच दरम्यान ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.तसेच मदत आणि बचावकार्य सुरू केलं.स्थानिक अधिकाऱ्यांनी इमारत कोसळण्याच्या कारणाची चौकशी सुरू केली आहे आणि अधिकारी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का याचा आढावा घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode