पंतप्रधान मोदींचा घानाकडून सर्वोच्च नागरी सन्मान
- भारत-घाना संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा नवा आयाम नवी दिल्ली, 3 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक घाना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि घाना या दोन राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चे नवे स्वरूप प्राप्त झाल
pm modi  ghana


pm modi ghana


- भारत-घाना संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चा नवा आयाम

नवी दिल्ली, 3 जुलै (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक घाना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि घाना या दोन राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंधांना ‘व्यापक भागीदारी’चे नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भेटीदरम्यान विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यासाठी चार महत्त्वाचे करार करण्यात आले असून, पंतप्रधान मोदी यांना घानाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.

अक्रा येथील जुबिली हाऊस या राष्ट्राध्यक्ष निवासस्थानी मोदी आणि घानाचे अध्यक्ष जॉन ड्रमानी महामा यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. ही गेल्या तीन दशकांतील कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची घानाला झालेली पहिली राजकीय भेट ठरली आहे. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, कृषी, आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांत सहकार्य प्राधान्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने डिजिटल पेमेंट प्रणाली (यूपीआय), जन औषधि, कौशल्य विकास व लसी उत्पादनातील अनुभव घानासोबत शेअर करण्याचा प्रस्ताव दिला. याशिवाय, भारताच्या सहकार्याने सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अधिक बळ देण्यावर भर देण्यात आला.

बैठकीदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण, मानकीकरण, पारंपरिक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, तसेच परराष्ट्र मंत्रालयांमधील संयुक्त आयोग बैठकांशी संबंधित चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

पंतप्रधान मोदींना ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी हा सन्मान भारतातील १.४ अब्ज नागरिकांना, तरुणांच्या आकांक्षांना, भारताच्या सांस्कृतिक विविधतेला आणि भारत-घाना ऐतिहासिक मैत्रीला समर्पित केला. या पुरस्कारामुळे दोन्ही देशांतील मैत्री आणखी दृढ होण्याची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संयुक्त निवेदनात मोदींनी घानाच्या आर्थिक पुनर्रचनेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ‘फीड घाना’ या उपक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आयटेक आणि आयसीसीआर शिष्यवृत्ती दुहेरी करण्याची घोषणा केली, तसेच कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. संरक्षण क्षेत्रात सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि सैनिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर एकमत झाले.

भारताने घानाला ‘ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स’मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची तयारी दर्शवली. संयुक्त राष्ट्र सुधारणा, दहशतवादाविरोधी लढा, आणि जागतिक शांतता व शाश्वत विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. मोदींनी घानाला पश्चिम आफ्रिकेतील ‘आशेचा किरण’ असे संबोधले.

मोदींनी भारताच्या G-20 अध्यक्षतेदरम्यान आफ्रिकन युनियनला जी-20 चा कायमस्वरूपी सदस्यत्व मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांनी घानाच्या ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ’ परिषदेतील सहभागाचे स्वागत केले आणि ग्लोबल साउथ देशांच्या आवाजासाठी भारत कटिबद्ध असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी घानामधील भारतीय समुदायाच्या योगदानाचीही विशेष प्रशंसा केली. शिक्षक, डॉक्टर, अभियंते हे अनेक दशकांपासून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत, असे त्यांनी सांगितले. शेवटी, त्यांनी राष्ट्राध्यक्ष महामा यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.

उल्लेखनीय बाब म्हणजे भारत आणि घानामधील संबंध वसाहतवादी काळापासून दृढ राहिले आहेत. भारताने घानामध्ये रेल्वे, माहिती तंत्रज्ञान, पारंपरिक औषध व्यवस्था आणि औद्योगिक प्रकल्पांत सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande