यवतमाळ, 3 जुलै (हिं.स.)।
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर ३० सप्टेंबरपर्यंत विशेष आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक साक्षरता शिबिर अभियानास सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या विशेष आर्थिक साक्षरता शिबिरामध्ये बँकांद्वारा महिला, वृद्ध नागरीक, मजुर वर्ग, विद्यार्थी व इतर आर्थिक क्षमता कमजोर असलेल्या जनसामान्यांसाठी प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत नवीन बचत खाती उघडण्यात येणार आहे. तसेच जुनी व निष्क्रिय प्रधानमंत्री जनधन योजनेमधील खात्यांची केवाईसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या शिबारामध्ये विशेष जोर देण्यात येणार आहे.
शिबाराद्वारे अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, सुकन्या योजना व पीपीएफ खाते याबाबत जनजागृती करण्यात येणार असून खातेदारास सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता नोंदणी करता येणार आहे. जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाद्वारे ग्रामपंचायत निहाय बँक शाखेद्वारा घेण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता शिबिराचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक या अभियानात सहभागी आहे.
जिल्हा प्रशासन व नाबार्डद्वारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याबाबत व अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने