मुंबई, 31 ऑगस्ट (हिं.स.)।‘रामायण’ बनवणारे रामानंद सागर यांचे पुत्र आणि दिग्दर्शक प्रेम सागर यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत शोककळा पसरली आहे. प्रेम सागर यांच्या निधनावर ‘रामायण’मध्ये राम आणि लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, प्रेम सागर यांना मागील काही काळापासून तब्येतीची समस्या होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी (दि.३१) सकाळीच डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला, आणि त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी ३ वाजता मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी प्रेम सागर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी प्रेम सागर यांचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले, “‘रामायण’ या टीव्ही मालिकेला एक विशिष्ट स्वरूप देऊन, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून भगवान श्रीरामांची मर्यादा, आदर्श आणि शिकवण जनतेपर्यंत पोहोचवणारे स्व. रामानंद सागर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते प्रेम सागर यांचे निधन ही अत्यंत दुःखद बातमी आहे. प्रभु श्रीरामचरणी प्रार्थना आहे की, दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान दे, आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
ॐ शांती.
‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी देखील प्रेम सागर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले , “ही दुःखद बातमी शेअर करताना अत्यंत दुःख होत आहे. रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर हे स्वर्गवासी झाले आहेत. भगवान त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode