ब्रिगेडीअर मो. उस्मान आणि मेजर सोमनाथ शर्मांचाही अंतर्भाव
नवी दिल्ली, 07 ऑगस्ट (हि.स.) : आता इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान आणि मेजर सोमनाथ शर्मा यांच्या जीवनकथा शिकवण्यात येणार आहेत. याच शैक्षणिक वर्षापासून या तिन्ही सैन्य अधिकाऱ्यांच्या शौर्य व बलिदानाची कथा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे धडे आठवी उर्दू, सातवी उर्दू आणि आठवी इंग्रजी यामध्ये जोडण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या नवीन धड्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना शौर्य, देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा यांच्या प्रेरणादायी कथा शिकवण्याचा आहे.
फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. त्यांचे नेतृत्वगुण आणि रणनीतिक कौशल्य यामुळे त्यांना आजही आठवले जाते. त्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे युद्ध 13 दिवस चालले होते आणि शेवटी पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यांना 1968 मध्ये पद्म भूषण आणि 1972 मध्ये पद्म विभूषण या देशातील 2 सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरविण्यात आले होते.
ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे 1947 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेले भारतीय सैन्यातील सर्वाधिक दर्जाचे अधिकारी होते. एक मुस्लिम असूनही, त्यांनी देशाच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक बनत पाकिस्तानात जाण्याचे नाकारले आणि भारतीय सैन्यातच सेवा सुरू ठेवली. जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध लढताना 3 जुलै 1948 रोजी त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले.
मेजर सोमनाथ शर्मा यांनी द्वितीय महायुद्धात बर्मामधील अराकान मोहिमेत भाग घेतला होता. त्यानंतर 1947 मध्ये भारत-पाक युद्धात श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध लढताना 3 नोव्हेंबर 1947 रोजी ते शहीद झाले. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मेजर शर्मांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. हे या सन्मानाचे पहिले पारितोषिक होते. विशेष म्हणजे मेजर शर्मांच्या भावाच्या पत्नी सावित्रीबाई खानोलकर यांनी परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले होते.
राष्ट्रीय युद्धस्मारकाला एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्थान म्हणून स्थापन करण्याच्या प्रयत्नांतर्गत, संरक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सहकार्याने हे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत.
या स्मारकाची स्थापना नागरिकांमध्ये देशभक्ती, त्याग, राष्ट्रीय भावना आणि एकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या या बलिदानाच्या कहाण्यांमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या लष्करी इतिहासाचे ज्ञान तर मिळेलच, पण राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या वीरांची प्रेरणा देखील मिळेल.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी