अमरावतीच्या राजापेठ पोलीसाात गुन्हा दाखल अमरावती, 7 ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंस्टाग्रामवरील एका रीलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून, संबंधित रीलमध्ये नवनीत राणा यांच्याविषयी अश्लील व अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे. या प्रकरणी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ईसा भाई या इंस्टा खात्याच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद गुहे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ते इंस्टाग्राम पाहत असताना त्यांना ईसा भाई या नावाने असलेल्या खात्यावर एक रील दिसली. या रीलमध्ये एक युवक लाल शर्ट घालून वाहनात बसलेला दिसतो आणि नवनीत राणा यांच्याविरोधात अश्लील भाषेत बोलतो. ही नवनीत राणा, हिंदुस्थान सगळ्यांचं आहे – हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन – सगळे भाऊभाऊ आहेत, तू आधीही मार खाल्ली आहेस, आता थेट हत्या करणार, असे म्हणत त्या व्यक्तीने थेट जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकारामुळे निर्माण झालेल्या धक्कादायक वातावरणामुळे विनोद गुहे यांनी त्वरित राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर इसा भाईविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यापूर्वीही मिळाल्या आहेत धमक्या नवनीत राणा यांना यापूर्वीही धमक्यांचा सामना करावा लागला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांना गँगरेप करण्याची धमकी देणारे पत्र मिळाले होते. तर मे २०२५ मध्ये नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला पाकिस्तानमधून आलेल्या क्रमांकावरून धमकीचे फोन आले होते. याशिवाय धमकीची अनेक ईमेल्स देखील आल्या होत्या. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी