देहरादून, 16 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सहस्त्रधारा येथे ढगफुटीमुळे अनेक हॉटेल्स आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. सहस्त्रधारामध्ये सोमवारी(दि.१५) रात्री सुमारे ११ वाजता अचानक जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळं ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामुळं मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक जनप्रतिनिधींच्या माहितीनुसार, मुख्य बाजारात मोठ्या प्रमाणावर मलबा आल्याने २ ते ३ मोठी हॉटेल्स आणि अनेक दुकाने नुकसानग्रस्त झाली आहेत. माहितीप्रमाणे सोमवारी (दि.१५) रात्री सुमारे ११:३० च्या सुमारास ही घटना घडली. सहस्त्रधाराच्या मुख्य बाजारामध्ये प्रचंड मलबा जमा झाला. यामध्ये २ ते ३ मोठी हॉटेल्स खराब झाली, तर एका मार्केटमधील सुमारे ७ ते ८ दुकाने कोसळली. स्थानिकांनी सांगितलं की या दुर्घटनेत सुमारे १०० लोक अडकले होते, ज्यांना गावकऱ्यांनी सुखरूपपणे बचाव करून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. त्यांनी सांगितलं की १ ते २ लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यांचा शोध सुरू आहे. आपत्ती नियंत्रण कक्षाकडून रात्री २ वाजता माहिती देण्यात आली की घटनास्थळी एसडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या टीम रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मलबा आल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाची जेसीबी घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करण्याचं काम करत आहे. रात्रीपासून देहरादूनमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आयटी पार्कमध्येही मोठ्या प्रमाणावर मलबा साचला आहे. यामुळे सॉन्ग नदीचा जलस्तर खूप वाढला आहे. पोलिसांनी आसपास राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला मसूरीमध्येही पावसामुळे एका मजुराच्या घरावर मलबा कोसळला. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मजुराला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. देहरादूनमध्ये मध्यरात्रीपासून सतत पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील २४ तास अजून पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर खराब हवामानाचा अंदाज लक्षात घेता नैनीताल जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी हे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode