लातूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। जळकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे दोन भीषण दुर्घटना घडल्या असून त्यात चार जणांचा पुराच्या पाण्यात बळी गेला आहे. माळहिपरगा येथील पुलावर अडकलेल्या ऑटो रिक्षाला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे सीआयएसएफ जवानासह दोन तरुण वाहून गेले, तर दुसऱ्या घटनेत तिरूका येथील एक युवक नदीत मासेमारी करताना पडून वाहून गेला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार माळहिपरगा येथील चार ते पाच जण ऑटो रिक्षातून पाटोदा खुर्दकडे जात होते. या मार्गावरील पुलावर आधीपासूनच पाणी वाहत होते. प्रवाह कमी असल्याने चालकाने ऑटो पुलावर नेला; मात्र मधोमध पोहोचताच रिक्षा बंद पडली. तेवढ्यात वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक प्रचंड वाढला आणि रिक्षा अडकली. या दुर्घटनेत शान मुरहरी सूर्यवंशी (सीआयएसएफ जवान, राह. माळहिपरगा), वैभव गायकवाड (राह. माळहिपरगा) आणि विठ्ठल गवळे (राह. पाटोदा बुद्रुक) हे तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर चालक संग्राम सोनकांबळे (माळहिपरगा) आणि बंटी वाघमारे (पाटोदा बुद्रुक) हे दोघे कसाबसा बचावले. वाहून गेलेल्या तिघांपैकी शान सूर्यवंशी हा सीआयएसएफमध्ये नागपूर येथे कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो रजेवर गावाला आला होता. ड्युटीसाठी नागपूरकडे जाण्यासाठी तो निघाला होता; परंतु दुर्दैवाने पाटोदा खुर्द पुलावरच पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याच्यासोबत वैभव गायकवाड हा सोडण्यासाठी गेला होता, तर विठ्ठल गवळे हा पाटोदा बुद्रुकचा रहिवासी होता. दरम्यान दुसऱ्या घटनेत तालुक्यातील तिरूका येथील एक युवक मासेमारी करताना पाय घसरून तेरू नदीत पडला आणि तोही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे एका दिवसात तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा बळी गेला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश लांडगे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, तलाठी आकाश पवार, सरपंच सुनीता चव्हाण यांच्यासह महसूल व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली असून दुपारपर्यंत वाहून गेलेल्या तिघांचा शोध लागला नव्हता. या दुर्घटनेमुळे जळकोट तालुक्यात शोककळा पसरली असून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी-नाल्यावरील प्रवाह वाढल्यास नागरिकांनी त्यावरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis