अमरावती, 17 सप्टेंबर, (हिं.स.) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2022 पासून न घेण्यामागे एका ठरवलेल्या कारस्थानाचा भाग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात सत्ता पाहिजे आहे, सर्व सत्ता एकाच माणसाकडे असावी, ही त्यांची मानसिकता आहे, असा घणाघात त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा नुकताच आलेला निकाल हा फडणवीसांना दिलेला थेट चपराक आहे. भाजपच्या सत्ताकेंद्री धोरणामुळे लोकशाही संस्थांचा गळा घोटला जातोय, आणि यामध्ये नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रीयृत राजकारण जबाबदार असल्याचे ते यावेळी म्हणालेत.
सपकाळ यांनी भाजपमधील अंतर्गत संघर्षावरही बोट ठेवलं. महाराष्ट्रात जाहिरात वार सुरू आहे. मोहित कंबोज यांचा नवीन सेट फडणवीसांकडून लॉन्च होत आहे. शिवाजी महाराजांची नमतस्तक जाहिरात नको त्या ठिकाणी लावून विटंबना केली जातेय, असा आरोप त्यांनी केला.याला उत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या जाहिरातीतून आपली सत्ता दाखवण्याचा प्रयत्न केलाय, असेही सपकाळ म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सपकाळ यांनी शुभेच्छा देतानाही उपरोधिक टोले लगावले. नाल्याच्या गॅसमधून चहा, डिजिटल कॅमेराने फोटो, स्टेशन नसताना चहा विक्री — असे अनेक 'चमत्कार' नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहेत.प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन कुठे गेलं? बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही हे वास्तव मोदींनी स्वीकारावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“बोले तैसा चाले... पण मोदी उलट चालले”अशा शब्दांत सपकाळ यांनी आजच्या संवादात केंद्र सरकारवर सडेतोड प्रहार करत भाजपच्या आश्वासनांचा पोकळपणा उघड केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी