- दोनसाठी मुदत मागितली- सरकारचे मानले आभार
मुंबई, 2 सप्टेंबर (हिं.स.) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईची हाक दिली होती. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. अखेर आज पाचव्या दिवसाच्या अखेरीस सरकारकडून जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्या संदर्भातील जीआर देखील काढण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि अन्य सदस्यांच्या शिष्टमंडळाने उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यावर जरांगेंनी विखे पाटलांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले. तसेच मुंबईतून आता गावाकडं चला, असे आवाहन मराठा बांधवांना करत जरांंगेंनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मागण्या मान्य होताच आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला.
आज, मंगळवारी दुपारी विखे पाटलांनी शिष्टमंडळासह आझाद मैदानात जरांगेंची भेट घेतली. या शिष्टमंडळात उपाध्यक्ष उदय सामंत, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर होते. या चर्चेत जरांगेंनी केलेल्या मागण्यांपैकी हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे, प्रलंबित जात पडताळणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, अशा सहा मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी एक महिन्याची मुदत आणि मराठा-कुणबी एकच शासन निर्णय दोन महिन्यांची मुदत सरकारकडून मागण्यात आल्याने या दोन मागण्या प्रलंबित आहेत.
यावेळी चर्चेदरम्यान विखे पाटील यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ समितीचा प्रमुख म्हणून मलाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे माझ्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही आमच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच दिले आहेत, त्यामुळे आपण उपोषण सोडावं, अशी विनंती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.
मराठा-कुणबी आहे असा जीआर काढा, मराठा-कुणबी एकच हा जीआर जारी करा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. यावर समितीने ते किचकट आहे त्याला वेळ लागेल. एक महिना लागेल. पण, मी म्हणतो त्याला दोन महिने घ्या पण जी आर काढा, असे जरांगे म्हणाले. आता सगेसोयरेचा निर्णय घ्या म्हणालो. ते म्हणताय याला वेळ लागेल, 8 लाख चुकीच्या नोंदी आहेत, त्याबद्दल वेळ लागणार आहे.
'जिंकलो रे राजा आपुन' - जरांगे
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसह मंत्रिमंडळाचे आभार मानले. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, असे मराठा बांधवांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले. 'आजचा दिवस सोन्याचा आहे' आणि 'आपण लढाई जिंकलो'. आरक्षणाची मागणी मान्य झाल्याचे सांगताना जरांगे यांचे डोळे पाणावले होते. सर्वांनी आपापल्या घरी सुखरूप जावे, असे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले. 'जिंकलो रे राजा आपुन' अशी घोषणाही केली. माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाल्याचेही ते म्हणाले.
जरांगेंच मान्य केलेल्या प्रमुख मागण्या तपशीलवार पाहिल्यास
1) हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करा - हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्यणास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तीच्या गावातील/कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यााधारे स्थानिक चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत.
2) सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय - सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटिअरच्या अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात यावा.
3) ५८ लाख नोंदीचे रेकॉर्ड सर्व ग्रामपंचायत कार्यालयावर लावण्यात यावे. कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांची तात्काळ वैधता काढण्याचा शासन निर्णय काढण्यात यावा.
4) आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा शासन निर्णय काढला
5) आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना लगेच तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीचे आदेश काढण्यात यावेत. यावर मराठा आंदोलनामध्ये ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत १५ कोटींची मदत दिली. उर्वरित मदत एका आठवड्यात देणार, असे आश्वासन सरकारने दिले.
6) मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना वाहतूक विभागाकडून करण्यात आलेला दंड माफ
दरम्यान तूर्तास मान्य न झालेल्या मागण्यांमध्ये संविधानाला धरून आरक्षण देणे : मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत बसणारे आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण देणे. सगेसोयरे धोरणाची पूर्ण अंमलबजावणी : मराठा समाजातील कुणबी नोंदींवर आधारित सगेसोयरे (नातेसंबंध) धोरणाची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे, या दोन मागण्यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी