नवी दिल्ली , 29 सप्टेंबर (हिं.स.)। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्र “आय ऍम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स” या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे लेखन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी सांगितले आहे की, त्यांच्या या पुस्तकाला भारतातील पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या शीर्षकातून प्रेरणा मिळाली आहे. या आत्मचरित्राची भारतीय आवृत्ती लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. रूपा पब्लिकेशन या पुस्तकाचे प्रकाशन करणार असून भारतात याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, या विशेष पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे त्यांच्यासाठी एक सन्मानाची बाब आहे. या प्रस्तावनेत मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना एक देशभक्त आणि उत्कृष्ट समकालीन नेत्या असे संबोधले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत मोदींनी नमूद केले आहे की, गेल्या ११ वर्षांत त्यांनी जगभरातील अनेक नेत्यांशी भेटी घेतल्या आहेत आणि त्या नेत्यांची जीवनयात्रा विविध प्रकारांची आणि प्रेरणादायक आहे.
अहवालानुसार, प्रस्तावनेत मोदींनी लिहिले आहे की, जॉर्जिया मेलोनी यांचे जीवन आणि नेतृत्व आपल्याला काही शाश्वत सत्यांची आठवण करून देते. भारतात त्यांना एक आदर्श समकालीन राजकीय नेत्या आणि देशभक्त म्हणून पाहिले जाईल. जगाशी समान स्तरावर संबंध प्रस्थापित करताना आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यातील त्यांचा विश्वास भारतीय मूल्यांशी मिळता-जुळता आहे, असेही मोदींनी लिहिले आहे.
पंतप्रधान मोदींनी प्रस्तावनेत जॉर्जिया मेलोनी यांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, मेलोनी यांची प्रेरणादायक आणि ऐतिहासिक यात्रा भारतीयांच्या मनात खोलवर रुजली आहे. तसेच, मोदींनी आशा व्यक्त केली आहे की हे पुस्तक निश्चितच भारतीय वाचकांवर प्रभाव टाकेल.
जॉर्जिया मेलोनी यांचे हे आत्मचरित्र मूळात सन 2021 मध्ये लिहिले गेले होते, त्यावेळी त्या इटलीमध्ये विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode