रायगड, 29 सप्टेंबर (हिं.स.)।
रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन तर्फे आयोजित ‘रायगड फोटो एक्स्पो 25’ या भव्य प्रदर्शनास पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ४६५ हून अधिक फोटोग्राफर्सनी या प्रदर्शनाला भेट देत, फोटोग्राफी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, उपकरणे आणि नवकल्पनांचा अनुभव घेतला.
मराठा समाज हॉलमध्ये आयोजित या एक्स्पोचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे जी. एस. हरळय्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मंदार वर्तक, शिवसेनेचे समीर म्हात्रे, भाजपचे वैकुंठ पाटील आणि माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी असोसिएशनचे संस्थापक विवेक सुभेकर व अध्यक्ष समीर भायदे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण कार्यकारिणी आणि पेण फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, पुणे, ठाणे येथून आलेल्या नामवंत ब्रँड्सचे १८ स्टॉल्स एक्स्पोमध्ये उभारण्यात आले होते. निकॉन, कॅनॉन, फ्युजिफिल्मसारख्या आघाडीच्या कंपन्यांपासून थ्रीडी बॅकग्राउंड, बेबी शूट क्रॉप्सपर्यंत विविध उपकरणे प्रदर्शनात पहायला मिळाली.
‘रायगड फोटो सुंदरी’ फॅशन शो हे यंदाच्या एक्स्पोचे खास आकर्षण ठरले. ज्येष्ठ फोटोग्राफर्स प्रकाश सकपाळ, पराग गुप्तन यांच्यासह प्रशिक्षक पराग शिंदे व महेश तावरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘रंगोत्सव 2025’ स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या भव्य आयोजनाची संपूर्ण जबाबदारी पेण फोटोग्राफर्स असोसिएशनने उत्तम रित्या पार पाडली असून, रायगड जिल्ह्यातील फोटोग्राफी विश्वात हा एक्स्पो एक वैभवशाली पर्व ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके