करूर, 29 सप्टेंबर (हिं.स.) : तमिळनाडूच्या करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज,सोमवारी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या दुर्दैवी घटनेत 41 मृत्यू झाला असून, बरेच जण जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, निर्मला सीतारामन या या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसेच त्या जखमींचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री एल. मुरुगन आणि तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन उपस्थित राहतील. दरम्यान, आज चेन्नई येथे एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांच्या उपस्थितीत मेणबत्त्या पेटवून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. करूरमध्ये 27 सप्टेंबर रोजी तामिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख व अभिनेता विजय यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन 41 जण मृत्यूमुखी पडले. विजय यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामुळे ही घटना घडली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विजय यांच्या भाषणाच्या समाप्तीनंतर हजारोंच्या संख्येने लोक एकाचवेळी निघाले, गर्दीमुळे ही घटना घडली. यात अनेक लोक खाली कोसळून चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला असून, जखमींच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी