पाकिस्तानच्या क्वेटा येथे बॉम्बस्फोट; १४ ठार, ३५ जखमी
इस्लामाबाद, 3 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील क्वेटा शहरात मंगळवारी(दि. २) रात्री बलुचिस्तान नॅशनल पार्टी (बीएनपी) ची एक सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. रॅली संपल्यानंतर लगेचच बॉम्बस्फोट झाला, या बॉम्बस्फोटात किमान १४ लोकांचा मृत्यू, तर ३५ हून
पाकिस्तानच्या क्वेटा येथे बॉम्बस्फोट


इस्लामाबाद, 3 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमधील क्वेटा शहरात मंगळवारी(दि. २) रात्री बलुचिस्तान नॅशनल पार्टी (बीएनपी) ची एक सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. रॅली संपल्यानंतर लगेचच बॉम्बस्फोट झाला, या बॉम्बस्फोटात किमान १४ लोकांचा मृत्यू, तर ३५ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये माजी खासदार अहमद नवाज आणि पक्षाचे नेते मुसा बलोच यांचाही समावेश आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार हा स्फोट मंगळवारी(दि.२) रात्री सरदार अताउल्लाह मेंगल यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेच्या समारोपानंतर झाला. स्फोट सरियाब परिसरातील शाहवानी स्टेडियमजवळ घडला. प्रांतीय आरोग्यमंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी मृत आणि जखमींची अधिकृत पुष्टी केली आहे. अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगितले आहे. आत्तापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.रॅली संपल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी हा स्फोट झाला. हल्लेखोराने पार्किंग क्षेत्रात आपल्याकडील स्फोटके असलेल्या जॅकेटचा स्फोट केला, त्या वेळी रॅलीमधून परतणारे लोक आपल्या घरी निघत होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोर दाढी नसलेला होता. त्याचे वय ३५-४० वर्षे होते. त्याच्याकडे बॉल बेअरिंग्जने भरलेले सुमारे ८ किलो स्फोटके होती.

या रॅलीमध्ये पख्तूनख्वा मिल्ली अवामी पार्टीचे प्रमुख महमूद खान अचकजई, अवामी नॅशनल पार्टीचे असगर खान अचकजई, आणि नेशनल पार्टीचे माजी खासदार मीर कबीर मुहम्मद शाई उपस्थित होते, पण त्यांनाही कोणतीही इजा झालेली नाही. बीएनपीचे प्रमुख अख्तर मेंगल यांना देखील यात काहीही इजा झालेली नाही, कारण स्फोट त्यांच्यासाठी नियोजित प्रस्थानानंतर घडला. मात्र, प्रांतीय विधानसभेचे माजी सदस्य (एमपीए) मीर अहमद नवाज बलूच आणि पक्षाचे केंद्रीय श्रम सचिव मूसा जान यांच्यासह अनेक बीएनपी कार्यकर्ते आणि समर्थक जखमी झाले आहेत.

बीएनपी प्रमुख अख्तर मेंगल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतः सुरक्षित असल्याची पुष्टी केली, पण “आपल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी” असल्याचेही नमूद केले. त्यांनी दावा केला की, या स्फोटात बीएनपीचे १४ कार्यकर्ते ठार झाले आहेत.बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या हल्ल्याची निंदा करत, याला “मानवतेच्या शत्रूंनी केलेले भ्याड कृत्य” असे म्हटले आहे. स्फोटानंतर एक विशेष चौकशी समिती गठित करण्यात आली असून क्वेटा आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande