अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)।मोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विष्णोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणापेक्षा साफसफाई अधिक केली जाते, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या शाळेत विद्यार्थी पुस्तकांऐवजी झाडू घेऊन शाळेच्या स्वच्छतेचे काम करताना दिसत आहेत, तर शिक्षक वेळेवर न हजर राहत कधीही यावे, कधीही जावे अशा पद्धतीने शाळा चालवत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. शाळेत तीन शिक्षक असूनही वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळेच्या गेटसमोर असलेल्या रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून, ते विद्यार्थी आणि पालकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. याकडे शिक्षक व शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतील आणखी एक गंभीर बाब म्हणजे इमारतीवर दिवसभर माकडांचा विहार असतो. ही माकडे टिनावर उड्या मारून आवाज करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष भंग होते. यामुळे शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होत आहे. पालकांनी या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी शाळा प्रशासनाकडे केली आहे. या सर्व बाबींकडे शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण मिळावे, ही सर्वांचीच अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी