अमरावतीत आदिवासी समाजाचा जनआक्रोश भाकर मोर्चा
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करत आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी जनआक्रोश भाकर मोर्चा काढला. गळ्यात भाकर, कांदे व मिरच्यांची माळ घालून आंदोलकांनी सरकार
अमरावतीत आदिवासी समाजाचा जनआक्रोश भाकर मोर्चा; आरक्षणात घुसखोरीला तीव्र विरोध


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करत आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी जनआक्रोश भाकर मोर्चा काढला. गळ्यात भाकर, कांदे व मिरच्यांची माळ घालून आंदोलकांनी सरकार व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आक्रोश व्यक्त केला.

राज्यात सध्या धनगर, बंजारा आदी काही समाज घटकांकडून अनुसूचित जमातींच्या आरक्षणात समावेश मिळावा यासाठी मोर्चे काढले जात आहेत. याला विरोध म्हणून आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे. आमच्या हक्कात कोणालाही घुसू देणार नाही!, आदिवासी आरक्षण आमचाच अधिकार! अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला.

या मोर्चात महिला, विद्यार्थी, कर्मचारी तसेच युवक-युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. आंदोलक अर्जुन युनाते यांनी सांगितले की, आमच्या अस्तित्वावर गदा आणणाऱ्या कोणत्याही समाजघटकाला आदिवासी आरक्षणात सामावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.मोर्चा शांततेत पार पडला असला तरी आदिवासी समाजाच्या भावना तीव्रपणे व्यक्त झाल्या. आता सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande