नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून लाखो हेक्टर शेत जमिनीवरील पिके नष्ट झालेली आहे पंधराशे गावांना याचा फटका बसलेला आहे. शेतकरी यामुळे पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे आता शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी जोर धरू लागलेली आहे विशेष करून कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम दिसून येत आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतातील पिकांचा अक्षरशः चिखल झाला असून, या नुकसानीमुळे बळीराजाचा जणू कणाच मोडला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील १,५०९ गावांतील २ लाख ४७ हजार १९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २ लाख ६३ हजार २४७ शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक नुकसान येवला तालुक्यात झाले आहे. , शनिवारी आणि रविवारी बरसलेल्या जोरदार तडाख्यामुळे झालेल्या नांदगाव तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानीचा आकडा आणखी वाढणार आहे.
जिल्ह्यात मे महिन्यापासूनच पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीसाठी खोळंबा झाला. परिणामी पेरण्या उशिरा झाल्या. त्यातच पाऊस अधूनमधून उघडीप देत बरसतच राहिला. त्यामुळे कांदा, भातशेतीसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षबागा फुलशेतीला पावसाचा फटका बसला आहे. सप्टेबर महिन्यातच तर पावसाने चांगलाच कहर केला. आलेले पीक पावसामुळे मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV