अमरावती- वलगाव रोडवर झाडांची कत्तल
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)चांदुर बाजार–वलगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्ता विकासाच्या कामांतर्गत हिरव्या, परिपक्व झाडांची बेधुंद कत्तल सुरू असून, यामुळे परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांच्या स
वलगाव रोडवर हिरव्या झाडांची बेधुंद कत्तल; बांधकाम विभाग गप्प का?  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांमध्ये काय सुरू आहे? नागरिकांचा सवाल


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)चांदुर बाजार–वलगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्ता विकासाच्या कामांतर्गत हिरव्या, परिपक्व झाडांची बेधुंद कत्तल सुरू असून, यामुळे परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांच्या संगनमताने ही झाडांची हानी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वनविभागाकडून फक्त रस्त्यावर आलेल्या फांद्या कापण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. मात्र ठेकेदारांनी संधी साधत बाभूळ, कडुलिंब यासारख्या अनेक वर्ष जुनी झाडे मुळासकट तोडली आहेत. शेकडो वर्षांपासून सावली देणाऱ्या या झाडांमुळे वाहनधारक उन्हाळ्यात या मार्गाला प्राधान्य देत असत. आता मात्र ही हिरवळ नष्ट होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

ठेकेदारांकडून बेकायदेशीर लाकूडतस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, झाडांना रात्री आग लावून सकाळी ती कापून नेली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. यात शेतकऱ्यांना विनाकारण दोष दिला जात असून, तस्कर शेतकऱ्यांच्या नावावर झाडांची तोड करत असल्याचा आरोपही झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. गेल्या वर्षीही अशीच झाडांची कत्तल झाली, पण कोणतीच कारवाई झाली नाही, अशी आठवण करून देत या झाडांची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न विचारला जात आहे.

दरवर्षी सरकारकडून लाखोंचा निधी खर्च करून झाडे लावली जातात, मात्र लावलेली झाडं टिकवण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. आजही वलगाव रोडवर मागील झाडलावणीचे एकही झाड दिसत नाही.कोरोना काळात ऑक्सिजनसाठी लोक तडफडले, तेव्हा झाडांचे महत्त्व उमगले, पण आता पैशाच्या लालसेने झाडांची कत्तल सुरू आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई होणार का? की यंदाही हे प्रकरण गप्प बसण्यातच संपणार?, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande