अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) :रूग्णांना स्वस्त औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून जेनेरिक औषधे लिहून देणेही डाॅक्टरांना बंधनकारक केले आहे. मात्र त्याचवेळी आजाराचे निदान करणाऱ्या पॅथाॅलाॅजी लॅबकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांचेही दुर्लक्ष होत आहे.
पॅथाॅलाॅजी क्षेत्रावर सरकारी नियंत्रण नसल्याने बोगस पॅथाॅलाॅजी लॅब आणि पॅथाॅलाॅजिस्टचा अंजनगाव शहरात सुळसुळाट झाला आहे. हे बोगस पॅथॉलॉजिस्ट आणि लॅबचालक रूग्णांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने या क्षेत्रातील फसवणुकीकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस धोरण आखून हे क्षेत्र नियंत्रित करावे, अशी मागणी आता सामान्य नागरिकांकडून होत आहे.औषध खरेदी-विक्री, उत्पादनाकरीता डाॅक्टरांसाठी नोंदणी-परवाना बंधनकारक असून या नोंदणीची जबाबदारी निश्चित यंत्रणांवर टाकण्यात आली आहे. त्याचवेळी पॅथाॅलाॅजी लॅबसाठी नोंदणी हा प्रकारच नाही. त्यामुळे कुणीही, कुठेही या पॅथॉलॉजी लॅब थाटत रूग्णांची आर्थिक लूट करत आहेत.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट' ही संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून बोगस लॅब आणि बोगस पॅथालाॅजिस्टला आळा घालण्याची मागणी करत राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार याकडे कानाडोळा करत असल्याने बोगस पॅथाॅलाॅजिस्टचे फावत असल्याचा आरोप आता सामान्य नागरिकांकडून होत आहे.नोंदणी नसल्याने या पॅथाॅलाॅजी लॅबविरोधात कारवाई कुणी करायची? यावरही मतमतांतरे आहेत. अन्न आणि औषध प्रशासन, नगपालिका की आरोग्य विभाग यापैकी कुणी या लॅबवर कारवाई करायची यासंबंधीचा कुठलाही कायदा नसल्याने सर्वत्र सावळागोंधळ माजला आहे.पॅथाॅलाॅजी लॅब चालवण्याचे अधिकार कुणाला आहेत? यासह अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीचे पुढे काय झाले असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.. केंद्र सरकार आरोग्य क्षेत्राकडे लक्ष देत असताना याच क्षेत्रातील पॅथाॅलाॅजी लॅब घटकाकडेही आता केंद्रासह राज्याने लक्ष देत रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांना दणका द्यावा, अशी आशा सामान्य नागरिकांकडून होत आहे.
पदवीची चौकशी होणे आवश्यक
महाराष्ट्र पॅरा वैद्यकीय परिषद मध्ये समाविष्ट नसलेल्या मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी पदवी, पदविका नसताना अनेक जण अंजनगाव शहरात पॅथाॅलाॅजी क्लिनिकल,लॅबरोटरी चे व्यवसाय करत शहरात अवास्तव शुल्क आकारुन रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने पॅथाॅलाॅजी क्लिनिकल, लॅबरोटरी धारकांच्या पदवीची चौकशी होणे गरजेचे आहे तर बहुतांश परवानाधारक हे दोन दोन शहरात आपला व्यवसाय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याने याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान पॅथोलॉजी क्लिनिकल, लेबॉरोटरी संघटनेचे अध्यक्ष दिनेश धांडे म्हणाले की, अंजनगाव शहरात आमच्या संघटनेत पॅथाॅलाॅजी, क्लिनिकल लॅबरोटरी परवानाधारक आहेत तरी कोणा बाबत स्वंशय असल्यास चौकशीत निष्पन्न होईल
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी