
नवी दिल्ली, 10 जानेवारी (हिं.स.)। 2025 या वर्षात भारताने आपल्या स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासात एक विक्रमी टप्पा गाठला असून जीवाश्मेतर उर्जा क्षमतेची एकूण स्थापित क्षमता 266.78 गिगावॅटपर्यंत वाढली आहे. ही वाढ 2024 च्या तुलनेत 22.6 टक्के अधिक आहे, जेव्हा जीवाश्मेतर उर्जा क्षमता 217.62 गिगावॅट होती आणि 2024 या वर्षात 49.12 गिगावॅट नवीन जीवाश्मेतर उर्जा क्षमतेची भर पडली होती. असे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
सौर आणि पवन ऊर्जेमुळे नवीकरणीय ऊर्जेच्या विस्ताराला चालना नवीकरणीय ऊर्जेच्या विस्तारात सौर ऊर्जेने आघाडी घेतली आहे. सौर ऊर्जेची स्थापित क्षमता 2024 मधील 97.86 गिगावॅटवरून 2025 मध्ये 135.81 गिगावॅटपर्यंत वाढली, जी 38.8 टक्के वाढली आहे. पवन ऊर्जा क्षमतेतही सातत्यपूर्ण वाढ दिसून आली. पवन ऊर्जा 48.16 गिगावॅटवरून 13.2 टक्के वाढ दर्शवत 54.51 गिगावॅटपर्यंत पोहोचली. एकूणात, सौर आणि पवन ऊर्जेने या वर्षात भारताच्या नवीकरणीय ऊर्जेच्या विस्ताराला निरंतर चालना दिली आहे.
जैव ऊर्जा आणि लघु जलविद्युत प्रकल्पांमुळे स्वच्छ ऊर्जेच्या विविधीकरणात भर इतर नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांनीही 2025 मधील एकूण उर्जा निर्मितीच्या वाढीस हातभार लावला. जैव ऊर्जेची स्थापित क्षमता 11.61 गिगावॅटपर्यंत पोहोचली असून यात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ऑफ-ग्रिड प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या 0.55 गिगावॅट उर्जेचा समावेश आहे. यातून स्वच्छ इंधन निर्मिती आणि कचरा व्यवस्थापनातील सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते.
लहान जलविद्युत प्रकल्पांची क्षमता 5.16 गिगावॅटपर्यंत वाढल्याने विकेंद्रित आणि प्रादेशिक आवश्यकतेनुसार विशिष्ट नवीकरणीय ऊर्जा विकासाला पाठबळ मिळाले आहे. मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची क्षमता 50.91 गिगावॅट होती, ज्यात पंप स्टोरेजच्या 7175.6 मेगावॅटचा समावेश आहे. यामुळे ग्रिडची स्थिरता आणि नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण मजबूत झाले.
धोरणात्मक नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा मार्गाला बळकटी 2025 मध्ये साध्य झालेली विक्रमी वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील निर्णायक धोरणात्मक दिशा, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीचे प्रतिबिंब आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. ही प्रगती ऊर्जा सुरक्षा, हवामानविषयक जबाबदारी आणि आत्मनिर्भर हरित अर्थव्यवस्थेकडे भारताचा मार्ग अधिक मजबूत करते, तसेच 2030 पर्यंत 500 गिगावॅट जिवाश्मेतर ऊर्जा क्षमतेच्या राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने देशाला पुढे नेत आहे.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय देशभरात नवीकरणीय ऊर्जेच्या विस्ताराला आणखी गती देण्यासाठी राज्ये आणि संबंधित घटकांसोबत मिळून काम करत राहील, असेही मंत्र्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule