
अकोला, 11 जानेवारी (हिं.स.)।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अकोल्यात आयोजित जाहीर सभेत युती सरकार आणि भाजपवर तीव्र हल्लाबोल केला. भाजप भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची भाषा करत असताना सारे भ्रष्टाचारी भाजपमध्येच असल्याचा खळबळजनक आरोप वडेट्टीवार यांनी केला. भाजप हा “भिकाऱ्यांचा पक्ष” असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही वडेट्टीवार यांनी मिश्किल शैलीत टीका केली. नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता, मात्र अवघ्या दोन दिवसांतच त्यांच्याच खांद्यावर हात ठेवून गोडगोड बोलताना दिसले, असा टोला त्यांनी लगावला. “मोदींनी विचारलं असेल—किती खाल्लं? आणि अजित पवारांनी ७० हजार सांगितल्यावर मोदी म्हणाले असतील—खूप कमी आहे, आमच्यासोबत या, अजून खा; अर्धा तुम्ही खा, अर्धा आम्हाला द्या,” असा मिश्किल अंदाज व्यक्त करत त्यांनी सभेत हशा पिकवला.यावेळी वडेट्टीवार यांनी आणखी एक किस्साही सांगितला. संविधान निर्मितीच्या वेळी सर्वांना मतदानाचा हक्क मिळावा अशी भूमिका होती, मात्र त्यावेळी भाजपाने फक्त श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांनाच मतदानाचा हक्क द्यावा, अशी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सातत्याने ७० वर्षांत काँग्रेसने काय केलं, असा सवाल करत असल्यावरही वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं. नरेंद्र मोदी ज्या प्लॅटफॉर्मवर चहा विकत होते, तो प्लॅटफॉर्म काँग्रेसने बांधला, ज्या शाळेत ते शिकले ती शाळा काँग्रेसने उभारली, तसेच देशातील अनेक मूलभूत सुविधा काँग्रेसच्या काळातच निर्माण झाल्या असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे