थेट सत्ता असताना काय केलं?, सचिन सावंतांचा सरकारला सवाल
मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 2026 साठीचा वचननामा जाहीर होताच काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2017 च्या भाजपच्या जाहीर
Sachin Sawant  Devendra Fadnavis


मुंबई, 11 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 2026 साठीचा वचननामा जाहीर होताच काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2017 च्या भाजपच्या जाहीरनाम्याची आठवण करून देत थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना नेमके काय काम केले?

सावंत यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्र्यांच्या “चांगल्या ट्रॅक रेकॉर्ड”च्या दाव्यावरही निशाणा साधत 2017 मधील आश्वासनांची आठवण करून दिली. त्यांनी 11 लाख घरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांबाबतच्या आश्वासनांचे काय झाले, याविषयी प्रश्न उपस्थित केला असून लवकरच भाजपच्या आणखी आश्वासनांची ‘हायलाइट्स’ जाहीर करू, असेही सूचित केले.

सचिन सावंत यांनी आरोप केला की दोन महिने हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रचार केल्यानंतर निवडणुकीच्या दोन दिवस आधी महायुतीने आपला “जुमलानामा” जाहीर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे “सपनों के सौदागर” असल्याची टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या तारखा कधीच पूर्ण होत नाहीत, असा आरोप केला.

2017 पर्यंत पूरमुक्त मुंबई, ईस्टर्न फ्रीवे ठाण्यापर्यंत जोडण्याचे आश्वासन पूर्ण झाले नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर होण्याच्या बाबतीत 2019 पासून वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या, पण लक्ष्य दूरच आहे, असे ते म्हणाले. बांगलादेशी आणि रोहिंग्या सर्वाधिक शोधून काढल्याचा दावा केला जातो, मग त्याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली.

दरम्यान, महायुतीचा 2026 साठीचा वचननामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. तब्बल दोन लाख मुंबईकरांच्या सूचना आणि अपेक्षांच्या आधारे वचननामा तयार केल्याचा दावा महायुतीने केला आहे. वचननाम्यात मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत 20 ते 35 लाख नवीन घरे उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील रहिवाशांना 350 चौ.फुटांपर्यंत घरे धारावीतच दिली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षे पाणीपट्टी न वाढवण्याची घोषणा तसेच बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयही वचननाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande