
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।
पालघर जिल्ह्यातील केळवे-माहीम गावातील अवघ्या सात वर्षांच्या मन संतोष पाटील या बालकलाकाराने मराठी व हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. इयत्ता पहिलीत शिकणारा मन आपल्या सहज, नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्रात पुढे येणाऱ्या या चिमुकल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ग्रामीण भागात मुलांच्या कलागुणांना अनेकदा अपेक्षित प्रोत्साहन मिळत नाही; मात्र मनची जिद्द आणि पालकांची साथ यामुळे त्याला संधी मिळाल्या. सन मराठी, सब टीव्ही, सोनी मराठी, दंगल टीव्ही अशा वाहिन्यांवरील मालिकांमधून त्याने अभिनय प्रवास सुरू केला.
‘प्रेमास रंग यावे’ (सन मराठी) या मालिकेत प्रमुख पात्र शौर्यची भूमिका साकारत मन प्रेक्षकांच्या परिचयाचा झाला. यासोबतच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (सब टीव्ही), ‘जय जय शनि देव’ (सोनी मराठी), ‘धर्तिपुत्र नंदिनी’, ‘दिल को तुमसे प्यार हुआ’, ‘परी की गुडिया’ (दंगल टीव्ही) अशा मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. ‘जय जय शनि देव’ मालिकेत शनि देवांच्या बालपणीची भूमिका ही त्याची पहिली ठळक भूमिका ठरली. शाळेतील विविध वेशभूषा व अभिनय स्पर्धांमधील सहभागातून मनच्या अभिनय क्षमतेची दखल घेण्यात आली. लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड जोपासणारा मन सातत्याने मेहनत घेत आहे.
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सावित्री ज्योतिराव फुले’ या मालिकेत तो सावित्रीबाईंच्या लहान भावाची भूमिका साकारत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या माहीममधील हा बालकलाकार छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करत असून त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL