
परभणी, 11 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारयुध्दात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक हे हजेरी लावून मोठी वातावरण निर्मिती करीत निघून गेल्यानंतरसुध्दा काँग्रेस व शिवसेना उबाठा या दोन प्रमुख राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक अद्यापही न फिरकल्याने या दोन्ही पक्षाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पहिला दौरा करीत सलामी दिली. त्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 जानेवारी रोजी हजेरी लावून जंगी जाहीर सभा घेतली. लगेचच या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही या मालिकेत जनसंवाद मेळावा तर महसूलमंत्री बावनकुळे यांनी मेळाव्यासह कॉर्नरसभासुध्दा घेवून वातावरण निर्मिती करतेवेळी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतेमंडळींसह उमेदवारांना मोठा दिलासा दिला.
भाजपा प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 9 जानेवारी रोजी परभणीचा धावता दौरा करीत मोठी सभा घेतली. त्या सभेच्या पूर्वसंध्येस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मोठ मोठ्या कॉर्नर सभा घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही परभणीचा दौरा करीत मोठी सभा घेतली. तर 65 पैकी 18 जागा लढविणार्या एआयएमआयएम या पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही आज रविवारी मोठी सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेतला.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील एकाही स्टार प्रचारकाने दौरा केला नाही. त्या प्रमाणे शिवसेना उबाठा गटाच्याही स्टार प्रचारकाने दौरा करीत सभा घेतली नाही. या पक्षाने मोठी सभा नको, असा सूर आळवला होता. स्थानिक खासदार व आमदारांनी स्वतःच या प्रचारयुध्दातून उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केला.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे सर्वे सर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अपेक्षित होता. परंतु, तो दौरा आला नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दौरा व सभा अपेक्षित आहे.
दरम्यान, या निवडणूकीत प्रत्येक प्रमुख पक्षाने कॉर्नर सभांचा मोठा धूमधडाका सुरु केला आहे. विशेषतः जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर या कॉर्नरसभांमध्ये आघाडीवर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis