
पालघर, 11 जानेवारी (हिं.स.)।
सोमवंशी पाठारे समाजोन्नती संघाचे ९७ वे वार्षिक अधिवेशन नुकताच केळवे येथे निसर्गसौंदर्याने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या नूतन विद्या विकास मंडळाच्या आदर्श विद्या मंदिर शाळेच्या भव्य पटांगणावर (जानकी–जगन्नाथ बाळा राऊत नगरी) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. संघाचे अध्यक्ष जयवंत सदाशिव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्या आयआरएस अधिकारी स्मिता डोळस–सोमणे (अतिरिक्त महासंचालक, मूल्यांकन संचालनालय, वित्त मंत्रालय, केंद्र सरकार) होत्या. त्यांनी यूपीएससी स्पर्धा परीक्षा व संबंधित सेवांबाबत विद्यार्थ्यांना सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासातील सातत्य, योग्य दृष्टिकोन तसेच पालक व मार्गदर्शकांची भूमिका यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.
स्वागताध्यक्ष हितेंद्र (भाई) पांडुरंग पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे व समाजबांधवांचे स्वागत करताना केळवे गावाचा इतिहास, सामाजिक संस्था, गावाचा विकास आणि त्यात समाजबांधवांचे योगदान याचा संक्षिप्त आढावा मांडला.
संघाचे विश्वस्त अध्यक्ष राजीव पाटील (प्रथम महापौर, वसई-विरार महानगरपालिका) यांनी १९१० साली स्थापन झालेल्या संघाच्या शतकी वाटचालीचा उल्लेख केला. जिवंत लोकशाहीचा पुरस्कार करत सामाजिक उपक्रम सातत्याने राबवणारा हा संघ आज पाचव्या पिढीपर्यंत अखंडपणे कार्यरत असून भविष्यातही ही परंपरा सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिवेशनाचे अध्यक्ष जयवंत सदाशिव राऊत यांनी संघ स्थापनेच्या काळातील कठीण परिस्थितीचा उल्लेख करत एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांचे सहकार्य यामुळेच संघाची वाटचाल यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. केळवे येथे आयोजित अधिवेशनाच्या नियोजनाबद्दल आयोजकांचेही त्यांनी कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL