
कोल्हापूर, 12 जानेवारी (हिं.स.)।
कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्टा च्या अनोख्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या प्रचारा बरोबरच कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रश्न आणि विकास याबाबत ठोस भुमिका मांडली. रस्ते, हद्दवाढ, पंचगंगा प्रदुषण, महापूर, उद्योग, विमानतळ, खेळ आणि कला, सांस्कृतीक परंपरा याबाबत निर्णय आणि नियोजन याबाबतची दिशा स्पष्ट केली. कोल्हापूरातील महायुतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या मिसळ कट्टयावर विविध क्षेत्रातील शहर आणि जिल्हयातील शेकडो निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बी न्यूज वृत्त वाहीनीचे संपादक चारूदत्त जोशी, खासदार पुत्र युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, सिने अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी प्रकट मुलाखत घेतली.
कोल्हापूर शहरातील रस्त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शहरातील रस्ते चांगले झाले पण त्याबरोबरच सर्व नागरीकांच्यावर टोलचा बोजा पडणार होता. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी देऊन कोल्हापूर शहराला टोल मुक्त केले. याबरोबरच हद्दवाढीबाबत बोलताना ते म्हणाले की कोणत्या शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्या शहराचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे अशी माझी व्यक्तिगत तसेच सरकारची भूमिका आहे. पण हद्दवाढीला येथील अनेक राजकीय नेत्यांनी संबधीत गावानी प्रखर विरोध केला त्यामुळे हद्दवाढ करता आली नाही. तसेच प्रस्तावित गावांना करवाढी बाबतची भीती निर्माण झाली आहे.
आता सरकारने निर्णय घेतला आहे की हद्द वाढ झाल्यानंतर प्रस्तावित गावांना पाच वर्षे कोणतीही कर वाढ केली जाणार नाही त्यामुळे आता ही भीती बाळगण्याचे कारण नाही. तसेच ज्यांचा विरोध आहे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून हद्द वाढीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला तरच मी ताबडतोब हद्दवाढ करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की कोल्हापुर, इचलकरंजीसह काही प्रमुख शहर आणि गावांचे सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते त्याबरोबरच काही औद्योगिक क्षेत्राचेही पाणी नदीत येते त्यामुळे नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. हे रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभा केले पाहिजेत काही प्रमाणात ते केले असून आणखी यापुढेही सर्व शंभर टक्के हे सांडपाणी रोखण्या साठी प्रयत्न केले जातील त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच कोल्हापूर शहर आणि परिसराला होणारा महापुराचा विळखा रोखण्यासाठी आता नदीजोड प्रकल्पावर भर देण्यात आला असून त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी मराठवाडा भागात वळवण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत ते लवकरच पूर्ण होतील त्यानंतर कोल्हापूर शहराला मोठ्या महापुराचा धोका कधीही उद्भवणार नाही असेही त्यांनी सांगितले.
उद्योग क्षेत्रातील समस्या बाबत बोलताना ते म्हणाले की कोल्हापूर शहरात फौंड्री हब तसेच अनेक चांगले उद्योग आहेत पण त्याचा विस्तार करण्यासाठी आता जागांचा प्रश्न निर्माण झाले आहे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण होत असून या ठिकाणी आयटी सह इतर उद्योग विस्तारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पुणे बेंगलोर कॅरिडॉर मुळे ही येथील अनेक संधी उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यातील विकासासाठी होणार आहे. कृष्णाराज महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याला खेळाची मोठी परंपरा आहे अनेक राष्ट्रीय, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण झाले आहेत यापुढेही असेच खेळाचा विकास व्हावा यासाठी काय करणार असे विचारले असता त्यांनी केंद्र शासनाच्या खेलो इंडियासह अनेक राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे सांगितले.
अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कला आणि संस्कृती परंपरा जपण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या शाखा सुरू कराव्यात अशी मागणी केली यावर ते म्हणाले की चित्रपट क्षेत्रासह इतर सर्व कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी काही शैक्षणिक आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी पालक मंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत दादा पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके आदींसह महायुतीचे नेते, उमेदवार, सहकार, उद्योग सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar