
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : मराठा बिझनेसमन फोरम, रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने नूतन नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे हा कार्यक्रम झाला.
रत्नागिरीच्या प्रथम नागरिक होण्याचा मान सौ. शिल्पाताई सुर्वे यांना मिळाल्याचा मराठा बिझनेसमन फोरमला विशेष अभिमान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सौ. सुर्वे यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करताना स्थानिक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मराठा समाज उद्योजकतेकडे वळावा, स्वबळावर आर्थिक प्रगती साधावी या उद्देशाने कै. ॲड. आप्पासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून मराठा बिझनेसमन फोरमची स्थापना करण्यात आली. बेंगळुरू, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी आदी ठिकाणी विविध चॅप्टरच्या माध्यमातून या फोरमचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. मराठा बिझनेसमन फोरम, रत्नागिरी चॅप्टरच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे उद्योजकांच्या नेटवर्किंग बैठका नियमितपणे आयोजित केल्या जातात. रत्नागिरीतील मराठा उद्योजकांनी मोठ्या संख्येने मराठा बिझनेसमन फोरममध्ये सहभागी व्हावे व आपल्या व्यवसायवृद्धीसाठी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा बिझनेसमन फोरमचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी