
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) भारतात सर्वांना समान न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा हवा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले. रत्नागिरीत सहा दिवस सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाची रविवारी सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते.
महाभारताच्या उत्तरार्धाचे निरूपण करताना मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी महाभारतातील अनेक दाखले आणि दृष्टांत त्यांनी दिले. स्वजनांवर नव्हे तर सज्जनांवर प्रेम केले पाहिजे, असा संदेश श्रीकृष्णाच्या जीवनातून मिळतो, असे सांगून ते म्हणाले की, महाभारतासारख्या ग्रंथांमधून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपले आणि पर्यायाने देशाचे भवितव्य उज्ज्वल केले पाहिजे. हिंदू धर्मीय व्यक्तिगत उपासना खूप करतात, मात्र मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या सामूहिक उपासनेचे बळ त्याला नसते. संघटित होणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पण ती करतानाच उपासनेबरोबरच व्यायाम, सूर्यनमस्कार नित्यनेमाने करून शरीरही सुदृढ बनविले पाहिजे. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. त्या दृष्टीने प्रत्येकाने आचरण ठेवले पाहिजे, असे बुवांनी सांगितले.
महाभारत युद्धातील कर्ण आणि दुर्योधन या कौरवांच्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांचा शेवट आणि पांडवांचे सत्तारूढ होणे हा कथाभाग बुवांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने रंजक पद्धतीने शेवटच्या दिवशी रंगविला. दुर्योधन आणि भीमाचे गदायुद्ध त्यांनी श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभे केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी