
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाले किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास मोबदला देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये कुत्त्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी मंगळवारी 13 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात म्हत्त्वाची सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने
म्हंटले की, कुत्र्यांच्या चाव्यामुळे कोणतीही व्यक्ती जखमी झाली किंवा मृत्यू झाली, तर राज्य सरकारला मोबदला द्यावा लागेल. न्या. विक्रम नाथ यांनी श्वान प्रेमींना जबाबदार मानले आहे. तसेच कोर्टाने असा सल्ला दिला की, भटके कुत्रे भुंकून, चावा घेऊन दहशत पसरवतात. त्यामुळे ज्यांना श्वानांचे खूप प्रेम वाटते त्यांनी भटक्या कुत्र्यांना आपल्या घरी न्यावे असे न्यायालयाने म्हंटले आहे. यावेळी ऍड. मेनका गुरुस्वामी यांनी यावेळी युक्तिवाद केला की, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा संवेदनशील विषय आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, ही संवेदनशीलता फक्त कुत्र्यांसाठी दाखवली जाते.” त्यावर आपल्याला लोकांचीही तितकीच काळजी असल्याचे गुरूस्वामी यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर , सुप्रीम कोर्टाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस स्टँड, क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकांवरून आवारा कुत्त्यांना हटवण्याचा आदेश दिला होता. तसेच, सरकारी आणि सार्वजनिक स्थळांवर कुत्त्यांना प्रवेश न देण्याचा सुद्धा निर्देश दिला होता. त्यांनंतर आज न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मोकाट श्वानांच्या हल्ल्यात जखमी होणारे आणि मृत्यूमुखी पडणारे यांच्या मोबदल्याची जबाबदारी राज्य सरकारकडे वर्ग केली आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे