
दिसपुर, 18 जानेवारी (हिं.स.)।“आज भाजप संपूर्ण देशात लोकांची पहिली पसंती बनली आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, आसाम येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केले. पंतप्रधान मोदी सध्या आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी काझीरंगा नॅशनल पार्क परिसरात ₹6,957 कोटींच्या 35 किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे भूमिपूजन केले. यासोबतच त्यांनी दिब्रूगढ–गोमती नगर (लखनऊ) आणि कामाख्या–रोहतक या दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज पुन्हा एकदा काझीरंगाला येण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. त्यामुळे माझ्या मागील भेटीच्या आठवणी आपसूकच मनात येतात. दोन वर्षांपूर्वी काझीरंगात घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास अनुभवांपैकी आहेत. मला काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीदरम्यान या परिसराचे सौंदर्य अगदी जवळून अनुभवता आले. असममध्ये आल्यावर मला नेहमीच एक वेगळाच आनंद मिळतो.”
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, “आज भाजप संपूर्ण देशात लोकांची पहिली पसंती बनली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत भाजपवरील देशाचा विश्वास सातत्याने वाढत आहे. अलीकडे बिहारमध्ये निवडणुका झाल्या, तेथे २० वर्षांनंतरही जनतेने भाजपला विक्रमी मते दिली आणि विक्रमी जागा जिंकून दिल्या. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल लागले असून, तेथेही जनतेने पहिल्यांदाच भाजपला विक्रमी जनादेश दिला आहे. केरळच्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपला मोठा पाठिंबा मिळाला आणि तिरुवनंतपुरममध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडून आला आहे. या सर्व निकालांमधून स्पष्ट होते की आज देशाला चांगले शासन (गुड गव्हर्नन्स) आणि विकास हवा आहे.”
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधानांनी सांगितले, “काँग्रेसचा जन्म मुंबईत झाला, पण आज त्या शहरात काँग्रेस चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहे. देशाचा विश्वास काँग्रेसवर उरलेला नाही, कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही ठोस अजेंडा नाही.” ते पुढे म्हणाले, “काझीरंगा केवळ एक नॅशनल पार्क नाही, तर ती आसामची आत्मा आहे. भारताच्या जैवविविधतेचा हा एक अमूल्य ठेवा आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. काझीरंगा आणि येथील वन्यजीवांचे संरक्षण करणे म्हणजे केवळ पर्यावरणाचे रक्षण नव्हे, तर आसामच्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आहे. दरवर्षी ब्रह्मपुत्रा नदीची पातळी वाढली की येथील वन्यजीव उंच भागांकडे स्थलांतर करतात. गेंडे आणि हत्ती अनेकदा रस्त्यांजवळ अडकतात. म्हणून येथे ९० किमी लांबीचा कॉरिडॉर विकसित केला जात आहे. यासाठी सुमारे ७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दशकानुदशके येथील लोकांना असे वाटत होते की देशाचा विकास इतरत्र होत आहे आणि ते मागे पडत आहेत. ही भावना बदलण्याचे काम आम्ही केले. ईशान्य भारताच्या विकासाला आम्ही प्राधान्य दिले. येथे रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची होती, पण काँग्रेस सरकारने याकडे कधीच लक्ष दिले नाही. आम्ही येथे रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.”
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की काझीरंगा कॉरिडॉर वन्यजीव संरक्षण आणि कनेक्टिव्हिटी या दोन्ही दृष्टीने मैलाचा दगड ठरेल. भूमिपूजन आणि अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणे आसामच्या विकासाला आणखी वेग देईल. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आसामच्या जनतेच्या वतीने आभार मानले.
₹6,957 कोटींच्या या प्रकल्पामुळे काझीरंगा नॅशनल पार्कमधील वन्यजीवांच्या सुरक्षित हालचाली सुलभ होतील, राष्ट्रीय महामार्ग–715 वरील अपघात कमी होतील आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने 86.67 किमी लांबीच्या दोन लेन रस्त्याचे चार लेनमध्ये रूपांतर आणि 34.5 किमी लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या कॉरिडॉरखालील परिसर पावसाळ्यात वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्ग म्हणून कार्य करेल.
यापूर्वी शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी गुवाहाटी येथे आयोजित बोडो लोकनृत्य ‘बगुरुम्बा’ कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात 10,000 हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम गुवाहाटीतील अर्जुन भोगेश्वर बरुआ स्टेडियम, सारुसजाई येथे आयोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी 20 डिसेंबरपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या असम दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. तसेच आसामचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बरदालोई यांच्या पुतळ्याचे अनावरण केले असून, त्यांच्या नावावरूनच विमानतळाचे नामकरण करण्यात आले आहे. याशिवाय दिब्रूगढ येथे ₹10,601 कोटी खर्चाच्या ब्राउनफिल्ड अमोनिया-युरिया प्रकल्पाची पायाभरणीही त्यांनी केली. मागील दौऱ्यात त्यांनी गुवाहाटी आणि नामरूप येथे जाहीर सभांनाही संबोधित केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode