
मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची तयारी सुरू असून, यावेळी कथेत मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक जिथे ‘धुरंधर 2’मध्ये अक्षय खन्नाच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते, तिथे आता ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मधील मेजर विहान साकारणारा विकी कौशल या चित्रपटात जोरदार एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक आदित्य धर या चित्रपटाच्या माध्यमातून एका भव्य ‘धुरंधर युनिव्हर्स’ची पायाभरणी करत असून, यात अनुभव आणि तरुणाईचा जोश यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी कौशलच्या एंट्रीमुळे अक्षय खन्ना यांना चित्रपटातून वगळण्यात आलेले नाही. उलट, निर्मात्यांनी एका मास्टरप्लॅनअंतर्गत दोघांनाही एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटात हा एक प्रकारचे ‘महामिलन’ असणार असून, ‘धुरंधर’मधील वरिष्ठ अधिकारी आणि ‘उरी’मधील धाडसी मेजर विहान एकाच मिशनवर दिसणार आहेत. अक्षय खन्नाच्या भूमिकेचा स्क्रीन टाइम मर्यादित असला तरी विकीच्या एंट्रीमुळे चित्रपटातील थरार अनेक पटींनी वाढणार असल्याचे सांगितले जाते. मात्र विकी आणि रणवीर सिंह यांच्या भूमिका समोरासमोर येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
‘धुरंधर 2’ची स्टारकास्ट आधीच संजय दत्त, आर. माधवन आण अर्जुन रामपाल यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेली आहे. आता विकी कौशलच्या समावेशानंतर हा चित्रपट बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘वॉर इव्हेंट’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चा अशीही आहे की चित्रपटाची कथा पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असून रणवीर सिंह आणि विकी कौशल एकत्र अॅक्शन मोडमध्ये शत्रूंविरुद्ध मोर्चा सांभाळताना दिसू शकतात.
दिग्दर्शक आदित्य धर यांचा 2019 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ ने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले होतेच, शिवाय देशभक्तीची नवी लाटही निर्माण केली होती. ‘हाऊ इज द जोश?’ हा संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. जवळपास सात वर्षांनंतर, तोच जोश आणि तोच मेजर विहान शेरगिल ‘धुरंधर 2’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर