
रायगड, 03 जानेवारी (हिं.स.)। देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनीही त्यांच्या स्मारकाकडे कर्जत नगरपरिषद प्रशासनाने पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटिश सत्तेविरोधात लढताना बलिदान दिलेल्या या क्रांतिवीरांच्या स्मारकाची अवस्था स्मृतिदिनीही दयनीय असल्याने, हा केवळ दुर्लक्ष नव्हे तर हुतात्म्यांच्या बलिदानाचा थेट अपमान असल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील आमराई येथील क्रीडानगरी परिसरात उभारण्यात आलेल्या या स्मारकात “व्यर्थ न हो बलिदान” हा संदेश कोरलेला असताना, प्रत्यक्षात मात्र नगरपरिषद प्रशासनाने त्या शब्दांनाच हरताळ फासल्याचे चित्र दिसून आले. स्मारक परिसरात गवताचे जंगल वाढलेले, सर्वत्र कचरा पसरलेला, अस्वच्छता आणि दुर्लक्ष यांचे विदारक दर्शन घडत आहे. पवित्र स्मृतिदिनाच्या दिवशीही स्वच्छता करण्याचे साधे कर्तव्य प्रशासन पार पाडू शकले नाही, ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे नागरिक सांगत आहेत.
हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना मुरबाड येथील सिद्धगड परिसरात ब्रिटिश सैन्याने गोळ्या घालून ठार केले होते. त्यांच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकात कर्जत तालुक्यातील सुमारे ४० स्वातंत्र्यसैनिकांची नावे आणि मशाल उभारण्यात आलेली आहे. मात्र आज या स्मारकाला जणू वाऱ्यावर सोडण्यात आले असून, देखभालीचा कोणताही मागमूस दिसत नाही.
दहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी ऑगस्ट क्रांतीदिन, हुतात्मा स्मृतिदिन, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सन्मानपूर्वक कार्यक्रम होत असत. आज मात्र नगरपरिषद प्रशासनाची अकार्यक्षमता, बेफिकिरी आणि जबाबदारीपासून पळ काढण्याची वृत्ती उघड झाली आहे. कर्मचारी व अधिकारी कागदोपत्रीच देशभक्ती दाखवत असल्याचा आरोप नागरिक करत असून, अनेक ठिकाणी उभारलेली शिल्पेही अशाच प्रकारे दुर्लक्षित अवस्थेत आहेत.
“हुतात्म्यांच्या स्मृती जपण्याची नैतिक जबाबदारीही पार पाडता येत नसेल, तर नगरपरिषद नेमकी करते तरी काय?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ स्मारकाची स्वच्छता व दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही हुतात्मा प्रेमींनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके