
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. गुन्हेगारीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटले असून, दोघेही एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, गुन्हेगारी हा मुद्दाच प्रचारात ऐरणीवर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.कोयता गॅंग संपली पाहिजे, सांगणाऱ्यांची उमेदवार यादी बघा म्हणजे कळेल..
भाजपने पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मीडिया सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली. ते म्हणाले, 'कोयता गँग संपली पाहिजे, पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे पालकमंत्री सांगतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तर टोकापासून टोकापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे कोणत्या तत्त्वात बसते, हेच कळत नाही. अशा उमेदवारांमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढणार असून पुणेकर त्यांना मतदानातून चोख उत्तर देतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु