
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभागातून सक्षम प्रशासन घडविण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करत राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ३८७ ग्रामपंचायती असून, त्यापैकी शासनाच्या निकषांनुसार २८२ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या ग्रामपंचायतींनी करवसुली, डिजिटल ग्रामपंचायत, डिजिटल शाळा व अंगणवाड्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभिलेख अद्ययावतीकरण, ई-गव्हर्नन्स, लोकसहभाग तसेच विविध विकासकामांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन “उत्कृष्ट ग्रामपंचायत” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागली आहे.
या अभियानाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दौंड तालुक्यातील गलांडवाडी, बारामती तालुक्यातील काटेवाडी आणि पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी येथे उद्या दि. ५ जानेवारी २०२६ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेते श्री. भाऊ कदम व त्यांची टीम यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गलांडवाडी, काटेवाडी व आडाचीवाडी ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी संबंधित तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांच्या विनोदी शैलीतून अभियानाची उद्दिष्टे, लोकसहभागाचे महत्त्व व ग्रामविकासाच्या विविध बाबी प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या माध्यमातून ग्रामस्थांचा सहभाग अधिक बळकट होऊन अभियानास नवी ऊर्जा मिळेल. पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख उपक्रम तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु