
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। गर्भवती तनिषा भिसे (Tanisha Bhise Death) यांना वेळेवर वैद्यकीय उपचार व रुग्णवाहिकेची सुविधा न दिल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन संचलित) यांना पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयानं दोषी ठरवलं आहे. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नामांकित धर्मादाय रुग्णालयाविरोधात इतकी कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यात आलीये. संयुक्त धर्मादाय आयुक्त राजनी किरण क्षीरसागर यांनी दिलेल्या आदेशात, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात तसेच रुग्णाला वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात कसूर केल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.
गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू मागील वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता. उपचारांसाठी रुग्णालयाने १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली. ही रक्कम न भरल्याने उपचारांना विलंब झाला आणि त्यातूनच तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. उपचार नाकारल्याच्या या गंभीर प्रकरणानंतर विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांच्या निर्देशानुसार रुग्णालयाविरोधात कारवाई सुचवण्यात आली होती. त्यानुसार संयुक्त धर्मादाय आयुक्त क्षीरसागर यांनी या प्रकरणाची स्वयंप्रेरित (सुओ मोटो) चौकशी सुरू केली. दरम्यान, या चौकशीसाठी उपधर्मादाय आयुक्त (पुणे) डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय शाखेचे अधीक्षक दीपक खराडे तसेच निरीक्षक सचिन बकाळ आणि रवींद्र गावरे यांचा समावेश असलेल्या पथकाने सखोल तपास केला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय आणि त्याच्या ११ विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु