
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत भोर व हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेयजल योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अपुऱ्या निधीमुळे या योजनेला मोठा ब्रेक लागला असून, अनेक ठिकाणी कामे बंद, तर काही ठिकाणी अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
बिल मंजूर न झाल्याने ठेकेदारांकडून कामे थांबविण्यात आली आहेत. भोर व हवेली तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून निधीच्या कमतरतेमुळे ठेकेदारांनी कामांचा वेग कमी केला असून काही ठिकाणी कामे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना अद्यापही ‘हर घर जल’ योजनेची प्रतीक्षा आहे. उन्हाळा तोंडावर येत असताना ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निधीअभावी कामे रखडल्याने ग्रामस्थांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडून निधीसाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून निधी प्राप्त न झाल्याने ठेकेदारांची देयके अदा करता आलेली नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु