
परभणी, 3 जानेवारी (हिं.स.)। सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मुलींनी निर्भयपणे आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ व्हावे. सातत्यपूर्ण परिश्रमातूनच यश साध्य होते, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले.
विद्या निकेतन संस्थेच्या सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथे शनिवार 03 जानेवारी रोजी क्रांतीज्योती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘विद्यार्थिनींशी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. जया जाधव होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक परदेशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी यांनी विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास परभणी पोलीस दल भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास दिला. मुलींनी आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे व कोणत्याही अडचणीसमोर न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत यांनी विद्यार्थीदशेत मोबाईलचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनी पूजा ठोके व अनुजा जगताप यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कृतज्ञता गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा देशमुख, अरुणा पाटील, प्रणिता पांचाळ, सिताराम ठाकरे, रमेश मुळे व विठ्ठल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis