
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे सव्वा चार हजार घरांची सोडतीला महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला असून सोडत काढण्यास राज्य निवडणूक आयोगाने अखेर परवानगी नाकारली आहे. या सोडतीतून होणाऱ्या घरांचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने केले जाणार असल्याने स्थानिक नागरिक प्रभावित होऊ शकतात, यासाठी ही सोडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या बाबत म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव यांनी आयोगाकडे परवानगी मागितली होती. आता ही सोडत फेब्रुवारीतच जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हाडाने पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ४ हजार १६८ घरांची सोडत काढली आहे. या सोडतीसाठी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत ११ डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र, त्यानंतरही सोडत काढण्यात आली नाही. त्यानंतर म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव यांनी ही सोडत १६ किंवा १७ डिसेंबरला काढण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, त्याच आठवड्यातच महापालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. त्यामुळे ही सोडत काढता आली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु