
मुंबई, ३ जानेवारी (हिं.स.) : विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व राष्ट्रीय विचारधारेचे अभ्यासू भाष्यकार प्रा. डॉ. अशोकराव मोडक यांच्या निधनाने वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोकसंदेशात सांगितले की, सत्ता नव्हे तर संघटन, अभ्यास आणि राष्ट्रहित यांना प्राधान्य देणारे प्रा. डॉ. मोडक हे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. लोकप्रतिनिधींनी सातत्याने अभ्यासशील राहावे, ही त्यांची शिकवण आज अधिकच महत्त्वाची वाटते.
राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्यांनी भारतीय राज्यघटना, संघराज्यवाद, जागतिक राजकारण तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर प्रभावी मांडणी केली. विशेषतः प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ नये, यासाठी त्यांनी सभागृहात सातत्याने ठाम भूमिका मांडली. तसेच अनेक राष्ट्रीय हिताच्या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण व चळवळीच्या भूमिकेतून आवाज उठवला.
प्रा. डॉ. अशोकराव मोडक यांचे विचार, लेखन आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी