
पुणे, 03 जानेवारी, (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर निवडणूक आयोगाने नजर ठेवली आहे. बिनविरोध झालेल्या नगरसेवकांची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उमेदवारांनी अर्ज माघारी कधी घेतले, माघारीसाठी कोणता दबाव टाकण्यात आला का? यासंदर्भात सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले आहेत.
या प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, संबंधित सर्व निवडणूक क्षेत्रांतील माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या जागांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून विरोधी उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत. धमक्या, राजकीय हस्तक्षेप, तसेच प्रशासकीय अडचणी निर्माण करून उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडल्याचा दावा काही उमेदवारांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु